ट्रम्प यांच्या टॅरिफला नडले! कोण आहेत भारतीय वंशाचे नील कत्याल, ज्यांच्यामुळे अमेरिकन सुप्रीम कोर्टाने टॅरिफ रद्द केले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 10:51 IST2026-02-21T10:31:35+5:302026-02-21T10:51:46+5:30

Donald Trump vs Neal Katyal US Supreme Court Case: अमेरिकन सुप्रीम कोर्टाने डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण असंवैधानिक ठरवले आहे. भारतीय वंशाचे वकील नील कत्याल यांनी ही केस कशी जिंकली आणि कोण आहेत ते, वाचा सविस्तर.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जागतिक व्यापारावरील 'टॅरिफ' (आयात शुल्क) लावण्याच्या महत्त्वाकांक्षी निर्णयाला अमेरिकन सुप्रीम कोर्टाने मोठा दणका दिला आहे. या ऐतिहासिक न्यायालयीन लढाईचे महानायक ठरले आहेत भारतीय वंशाचे वकील नील कत्याल. त्यांच्या प्रभावी युक्तिवादापुढे ट्रम्प प्रशासनाचे टॅरिफ धोरण टिकू शकले नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांनी 'इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर्स ॲक्ट'चा वापर करून जगभरातील देशांच्या मालावर भरमसाठ आयात शुल्क लावले होते. या निर्णयामुळे भारतासह अनेक देशांच्या व्यापारावर परिणाम झाला होता. नील कत्याल यांनी याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले.

या केसमध्ये एक रंजक बाब समोर आली आहे. सुप्रीम कोर्टात या महत्त्वाच्या विषयावर युक्तिवाद करण्यासाठी वकिलांमध्ये कॉईन उडवण्यात आला होता. हा टॉस नील कत्याल यांनी जिंकला आणि त्यांना मुख्य वकील म्हणून बाजू मांडण्याची संधी मिळाली.

कायदेशीर उल्लंघन: कत्याल यांनी असा तर्क दिला की १९७७ च्या IEEPA कायद्यात 'टॅरिफ' किंवा 'टॅक्स' या शब्दांचा कोठेही उल्लेख नाही.

संविधानिक अधिकार: अमेरिकन संविधानानुसार, टॅक्स लावण्याचा आणि व्यापाराचे नियमन करण्याचा अधिकार फक्त 'काँग्रेस'ला (संसद) आहे, राष्ट्राध्यक्षांना नाही.

लोकशाहीचा विजय: कोर्टाच्या निकालानंतर कत्याल म्हणाले, "राष्ट्राध्यक्ष शक्तिशाली असतात, पण आमचे संविधान त्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे."

नील कत्याल यांचे आई-वडील भारतातून अमेरिकेत स्थायिक झाले होते. त्यांचे वडील इंजिनिअर तर आई डॉक्टर आहे. येल लॉ स्कूलमधून पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात क्लर्क म्हणून काम केले.

बराक ओबामांच्या काळात त्यांनी 'ऍक्टिंग सॉलिसिटर जनरल' म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

अमेरिकन सुप्रीम कोर्टात ५० पेक्षा जास्त वेळा युक्तिवाद करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

ट्रम्प यांच्या 'ट्रॅव्हल बॅन'लाही त्यांनीच आव्हान दिले होते, त्यामुळे त्यांना ट्रम्प यांचा 'कायदेशीर डोकेदुखी' म्हटले जाते.