२० हजार 'बेकायदेशीर भारतीयांना' बाहेर काढण्यावर ट्रम्प ठाम; मोदी सरकारनेही बनवली योजना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:30 IST2025-01-23T18:25:28+5:302025-01-23T18:30:40+5:30
अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीयांसाठी नवीन अडचणी निर्माण केल्या आहेत.

शिक्षण आणि नोकरीच्या शोधात अमेरिकेत गेलेल्या २० हजारांहून बेकायदेशीर भारतीयांना मायदेशी परतवण्यासाठी अमेरिका सज्ज आहे. त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
अमेरिकेचे नवनियुक्त परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी भारतातून अमेरिकेत आलेल्या बेकायदेशीर भारतीयांच्या स्थलांतरावर चर्चा केली. अमेरिकेने उचललेल्या या पावलामुळे भारतीय जनता व सरकार दोन्ही चिंतेत आहेत.
लवकरच भारत सरकार शिक्षण व नोकरीच्या हेतूने अमेरिकेत गेलेल्या बेकायदेशीर भारतीयांना परत आणण्यासाठी योग्य उपाययोजना तयार करणार असल्याचेही म्हटलं जात आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, अमेरिकेने बेकायदेशीरपणे अमेरिकेत वास्तव करणाऱ्या १८००० भारतीयांची यादी तयार केली आहे. वृत्तानुसार, भारत या स्थलांतरितांची पडताळणी करेल आणि त्यानंतर त्यांना मायदेशी घेऊन जाण्यासाठी योग्य प्रक्रिया सुरू होईल. या बेकायदेशीर स्थलांतरितांची संख्या १८ हजारांहून अधिक असू शकते, असेही या अहवालात म्हटले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इतर देशांवर व्यापार शुल्क लादण्याची धमकी देत आहेत. पण भारताला व्यापार शुल्क लादून घ्यायचा नसल्यामुळे बेकायदेशीर स्थलांतरच्या प्रक्रियेत देश अमेरिकन प्रशासनाला सहकार्य करणार असल्याचे म्हटलं जात आहे.
यासोबतच, अमेरिकेत व्हिसा प्रणालीवर रिपब्लिकन पक्षांच्या दोन गटांमध्ये वाद सुरू आहेत. एका गटाचे मत आहे की, परदेशातून येणाऱ्या लोकांच्या व्हिसावर पूर्णपणे बंदी घालावी कारण अमेरिकेतील नोकऱ्यांवर अमेरिकन लोकांचा हक्क आहे.
तर दुसऱ्या गटाचे मत आहे की, जगभरातील प्रतिष्ठित व प्रतिभावान लोकांना अमेरिकेत येण्याची संधी देण्यासाठी ही व्हिसाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन दोन गट पडले आहेत.
एच वन बी व्हिसाबाबतही ट्रम्प यांची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दोन्ही बाजू ऐकल्या आहेत आणि प्रतिभावान लोकांना कायदेशीररीत्या अमेरिकेत येण्याची परवानगी द्यावी, असे त्यांचे म्हणणे आहे. २०२३ मध्ये अमेरिकेने ३८६,००० एच वन बी व्हिसा दिले होते. यापैकी तीन चतुर्थांश व्हिसा भारतीयांकडे आले आहेत.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं की, अलीकडेच भारताने अमेरिकेतून काही अवैध स्थलांतरितांना परत बोलावले आहे. बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यासाठी भारत आपल्या बाजूने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे या संदर्भात ही प्रक्रिया पाहिली पाहिजे. गेल्या एका वर्षात अमेरिकेतून सुमारे १,१०० अवैध भारतीय स्थलांतरितांना परत पाठवण्यात आले आहे.
यूएस इमिग्रेशन आणि कस्टम एन्फोर्समेंट विभागानुसार, नोव्हेंबर २०२४ पर्यंत, अमेरिकेमध्ये एकूण २०,०४७ बेकायदेशीर भारतीय होते, ज्यांना हद्दपार करण्याचा अंतिम आदेश एकतर देण्यात आला होता.आकडेवारीनुसार, १७,९४० बेकायदेशीर स्थलांतरित अटक केंद्रांमध्ये नाहीत परंतु त्यांच्या हद्दपारीचे अंतिम आदेश देण्यात आले आहेत. तर २,४६७ बेकायदेशीर भारतीय अटक केंद्रांमध्ये उपस्थित आहेत.