स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 17:48 IST2025-08-21T17:38:40+5:302025-08-21T17:48:53+5:30
याच वर्षात आतापर्यंत अमेरिकेत ४४६ मोठ्या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आहेत. केवळ जुलै महिन्यातच तब्बल ७१ मोठ्या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आहेत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या देशाला कर्जाच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी विविध प्रकारच्या युक्त्या अवलंबताना दिसत आहेत. त्यांनी जगभरातील अनेक देशांवर जबरदस्त टॅरिफ लादले आहे. मात्र याचा उलटा परिणाम होताना दिसत आहे.
याच वर्षात आतापर्यंत अमेरिकेत ४४६ मोठ्या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आहेत. २०२० मधील कोरोना काळातील आकडेवारीच्या तुलनेत हे प्रमाण १२ टक्क्यांनी अधिक आहे.
केवळ जुलै महिन्यातच तब्बल ७१ मोठ्या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आहेत, जुलै २०२० नंतर एकाच महिन्यात दिवाळखोरीत निघालेल्या कंपन्यांचा हा सर्वात मोठा आकडा आहे.
ट्रम्प यांनी एप्रिल महिन्यात परदेशी वस्तूंवर १०% कर लादला होता. योगायोग असा की, याच महिन्यापासून अमेरिकेत दिवाळखोरीत निघणाऱ्या कंपन्यांच्या संख्येत तेजी आली. २०२५ च्या पहिल्या सहामाहीत ३७१ मोठ्या अमेरिकन कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या. जून महिन्यात ६३ कंपन्यांनी दिवाळखोरीसाठी अर्ज केला.
या वर्षी दिवाळखोरीत निघालेल्या कंपन्यांमध्ये १९९० आणि २००० च्या दशकातील अनेक लोकप्रिय ब्रँडचा समावेश आहे. यांत फॉरेव्हर २१, जोआन्स, राईट एड, पार्टी सिटी आणि क्लेअर यांचा समावेश आहे.
या वर्षात, औद्योगिक क्षेत्रातील ७० कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आहेत तर कंझ्युमर डिस्क्रेशनरी क्षेत्रातील ६१ कंपन्या बंद पडल्या आहेत. आरोग्यसेवा क्षेत्रातील ३२ कंपन्या, ग्राहक स्टेपलमधील २२ कंपन्या, आयटीमधील २१ कंपन्या, वित्तीय क्षेत्रातील १३ कंपन्या, रिअल इस्टेटमधील ११ कंपन्या, संप्रेषण सेवांमधील ११ कंपन्या, साहित्यातील ७ कंपन्या, युटिलिटीज तथा एनर्जी क्षेत्रातील ४ कंपन्या या वर्षात दिवाळखोरीत निघाल्या आहेत. या क्षेत्रातील कंपन्यांवर टॅरिफचा सर्वाधिक परिणाम दिसत आहे.
बेरोजगारीचं संकट - टॅरिफमुळे देशात महागाई आणि बेरोजगारी वाढण्याचा धोका देखील आहे. जुलै महिन्यात ११ टक्के लहान कंपन्यांनी, आपली विक्री अत्यंत खराब राहिल्याचे म्हटले आहे. अमेरिकेतील बेरोजगारीचे हे एक महत्त्वाचे सूचक आहे.
अमेरिकेतील लहान कंपन्यां ६.२३ कोटी लोकांना, म्हणजेच लोकसंख्येच्या ४५.९ टक्के लोकांना रोजगार देतात. अमेरिकेत २० ते २४ वयोगटातील तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण गेल्या तीन महिन्यांत सरासरी ८.१ टक्के आहे, जे चार वर्षांतील सर्वाधिक आहे. ते २००८ च्या पातळीवर आहे.
याशिवाय, खर्च कमी करण्यासाठी, कंपन्या एआयचा वापर करत आहेत आणि एन्ट्री लेव्हल जॉब्ज कमी करत आहेत. याच बरोबर, महागाईनेही पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. पीपीआय महागाईत ०.९ टक्क्यांनी वाढली आहे, जी २०२२ नंतर सर्वाधिक आहे.