इंग्लंड, ब्रिटन, ग्रेट ब्रिटन आणि युनायटेड किंग्डम एकच की वेगवेगळे? घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 03:08 PM2019-07-26T15:08:09+5:302019-07-27T07:48:52+5:30

इंग्लंड, ब्रिटन, ग्रेट ब्रिटन आणि युनायटेड किंग्डम ही नावे ऐकल्यावर तुम्हाला हा एक देश की वेगवेगळे, असा प्रश्न तुम्हाला नेहमी पडत असेल. तर आज जाणून घ्या या नावांमध्ये नेमका काय फरक आहे ते.

युनायटेड किंग्डमचे पूर्ण नाव युनायटेड किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्दन आयर्लंड असे आहे. इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंंड या चार समुहांना मिळून युनायटेड किंग्डम असे म्हटले जाते.

इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्स या तीन प्रांतांच्या समुहाला मिळून ग्रेट ब्रिटन म्हटले जाते. हे तिन्ही वेगवेगळे प्रांत आहेत. त्यांची स्वत:ची संसदही आहे. मात्र परराष्ट्र धोरण आणि संरक्षण याबाबतचे निर्णय ब्रिटनची संघीय संसद घेते.

रोमन काळातील ब्रिटानिया शब्दावरून ब्रिटन या शब्दाचा उगम झाला. यामध्ये इंग्लंड आणि वेल्स या प्रांतांचा समावेश होतो.

इंग्लंड हा वेगळा देश असून, लंडन ही त्याची राजधानी आहे. इंग्लंडचे स्वत:चे क्रिकेट आणि फुटबॉल संघ आहेत.

इंग्लंडची राजधानी लंडन आहे, वेल्सची राजधानी कार्डिफ आहे, तर स्कॉटलंडची राजधानी एडिनबरा आहे आणि उत्तर आयर्लंडची राजधानी बेलफास्ट आहे.

या सर्व प्रांतांची भाषा इंग्रजी असली तरी प्रांतानुरूप बोलीमध्ये फरक आहे. त्यावरून हे प्रांत एकमेकांची खिल्लीही उडवत असतात.

स्कॉटलंडच्या नागरिकांना आपल्या प्रसिद्ध स्कॉचवर गर्व आहे. उत्तर आयर्लंडचे लोक आयरिश व्हिस्की आणि बीयर पसंत करतात, तर इंग्लंड मच्छी आणि चिप्ससाठी प्रसिद्ध आहे.

या प्रांतांमध्ये विविध मुद्द्यांवरून मतभेदही दिसून येतात. बेक्झिटसारख्या मुद्द्यांवर या प्रांतांमध्ये मतभेद दिसून आले होते. तसेच काही वर्षांपूर्वी ब्रिटनपासून वेगळे होण्यासाठी स्कॉटलंडमध्ये सार्वमत घेण्यात आले होते.