coronavirus: कोरोना विषाणू नेमका आला कुठून? WHOच्या पथकाला तपासात मिळाला नवा पुरावा

By बाळकृष्ण परब | Published: February 9, 2021 08:51 AM2021-02-09T08:51:33+5:302021-02-09T09:06:34+5:30

coronavirus: कोरोना विषाणूचा नेमका उगम कुठून झाला याची माहिती घेण्यासाठी डब्ल्यूएचओचे १४ सदस्यीय पथक सध्या चीनमधील वुहानमध्ये आहे.

संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूच्या फैलावास सुरुवात होऊन आता वर्षभराहून अधिक काळ लोटला आहे. या काळात कोरोनामुळे जगभरात मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. या कोरोना विषाणूचा नेमका उगम कुठून झाला याची माहिती घेण्यासाठी डब्ल्यूएचओचे १४ सदस्यीय पथक सध्या चीनमधील वुहानमध्ये आहे.

वुहानमध्येच २०१९ च्या नोव्हेंबर महिन्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा पहिला रुग्ण सापडला होता. येथे तपास करत असलेले डब्ल्यूएचओचे पथक आता आपला तपास आटोपत आङे. दरम्यान, या पथकाला कोरोनाचा फैलाव होण्यामध्ये वुहानमधील सीफूड मार्केटच्या भूमिकेबाबत महत्त्वपूर्ण माहिती आणि पुरावे मिळाले आहेत.

याबाबत जीवाणूतज्ज्ञ पीटर दास्जाक यांनी सांगितले की, १० फेब्रुवारीपूर्वी तपासातील महत्त्वपूर्ण मुद्दे प्रसिद्ध करण्यात येण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, १४ सदस्यीय तपास पथकाने चीनच्या तज्ज्ञांसोबत मिळून काम केले आङे. आणि वुहानमधील हॉटस्पॉटचा दौरा करून महत्त्वपूर्ण पुरावे गोळा केले आहे. जेणेकरून कोरोनाचा फैलाव खरोखरच वुहानमधून झाला का याची माहिती मिळू शकेल.

दास्जाक यांनी सांगितले की, कोरोनाच्या संसर्गाचा प्रकोप कमी करण्यासाठी हा तपास टर्निंग पाँईंट ठरणार आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार दास्जाक यांनी सांगितले की, तपासामधून त्यावेळी नेमकं काय झालं होतं, याबाबत आम्हाला एक सखोल आणि व्यापक निष्कर्ष मिळवण्यास मदत होईल. तसेच त्याच्या अभ्यासावरून भविष्यात येणाऱ्या साथींना रोखण्यास आणि जागतिक अर्थव्यवस्थेला मोठ्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी तसेच लसीच्या प्रतीक्षेत होणारे मृत्यू टाळण्यासाठी मदत होईल.

यापूर्वीच्या अनेक रिपोर्टमध्ये कोरोना विषाणूच्या फैलावात वुहानमधील मार्केटची कुठलीही भूमिका नसल्याचे म्हटले होते. मात्र डब्ल्यूएचओच्या तज्ज्ञांनी याकडे दुर्लक्ष करत तपास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. आता त्यांना कोरोनाच्या फैलावामध्ये वुहानमधील मार्केटच्या भूमिकेबाबत महत्त्वपूर्ण पुरावे मिळाले आहेत.

असे असले तरी दास्जाक यांनी याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. सध्या आम्ही सर्व कड्या जोड़ण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या मार्केटमधून लोक घाईगडबडीत बाहेर पडले. आपली उपकरणे आणि सामान सोडून गेले. त्यांनी त्यावेळची परिस्थिती काय होती त्याचेही पुरावे मागे सोडले आहेत. त्याच गोष्टींवर आम्ही लक्ष केंद्रीत केले, असे दास्जाक यांनी सांगितले.

आता आम्हाला अनेक गोष्टींची माहिती मिळाली आहे. त्या आम्हाला आधी माहिती नव्हत्या. संसर्ग झालेल्या लोकांमध्ये अशा लोकांचाही समावेश होता. ज्यांच्यामध्ये कुठलीही लक्षणे दिसून येत नव्हती. तर काही जणांमध्ये सामान्य खोकला आणि सर्दी दिसून येत होती.

दास्जाक यांनी सांगितले की, वुहानच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या त्या पहिल्या रुग्णाव्यतिरिक्त शहरामध्ये अन्य लोकांमध्येही संसर्ग दिसून येत होता. मात्र त्यांची संख्या किती होती. हे सर्व कधी सुरू झाले. या अशा गोष्टी आहेत, ज्यावर आम्ही सर्वजण काम करत आहोत.

आतापर्यंत जागतिक पातळीवर कोरोनाचा संसर्ग हा १० कोटींहून अधिक लोकांना झाला आहे. तर २३ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रकोप वाढू लागल्यापासून या विषाणूच्या उत्पत्तीसंदर्भातील कारणांचा शोध घेण्याची मागणी होत आहे.