coronavirus: विषाणूच विषाणूला मारणार! कोरोनाच कोविड-१९ ला मारण्यासाठी बळ देणार, समोर आली दिलासा देणारी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 11:19 IST2020-07-19T10:51:34+5:302020-07-19T11:19:11+5:30
सिंगापूरमध्ये झालेल्या एका नव्या संशोधनामुळे कोरोनाविरोधात लढण्यासाठीच्या उपचारपद्धतीच्या माध्यमातून मोठी अपेक्षा निर्माण झाली आहे.

सध्या संपूर्ण जगातील मानवजातीसाठी गंभीर संकट ठरलेल्या कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठीचे उपाय आणि इलाजाबाबत अनेक देशात संशोधन सुरू आहे.
दरम्यान, सिंगापूरमध्ये झालेल्या एका नव्या संशोधनामुळे कोरोनाविरोधात लढण्यासाठीच्या उपचारपद्धतीच्या माध्यमातून मोठी अपेक्षा निर्माण झाली आहे.
सिंगापूरमध्ये झालेल्या या संशोधनानुसार ज्या लोकांना यापूर्वी कुठल्याही अन्य कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला असेल. त्यांच्यामध्ये कोविड-१९ चा फैलाव करणाऱ्या सार्स-सीओव्ही-२ विरोधात लढण्याची क्षमता आधीपासून विकसित झालेली असू शकते.
कोरोना विषाणू हे बऱ्याच काळापासून मानवी शरीरात वावरत आलेले आहेत. त्यामुळे त्यांची मदत घेऊन कोविड-१९ विरोधात लढण्यासाठी क्षमता विकसित करता येऊ शकते.
कोविड-१९ आजार ज्यामुळे होतो त्या सार्स-सीओव्ही-२ चा संसर्ग आधी झाला नसेल त्यांच्यामध्येसुद्धा कोरोनाविरोधात लढण्याची क्षमता विकसित झालेली असू शकते, असे सिंगापूरमधील संशोधनातून समोर आले आहे.
सार्ससारख्या संसर्गातून मदत
कोरोना विषाणू हा विषाणूंचा एक समूह आहे. तर कोविड-१९ हा विशेष प्रकारच्या सार्स-सीओव्ही-२ विषाणूमुळे होतो. नेचर या मासिकात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार ज्या व्यक्तींमध्ये पूर्वीच कुठल्याही अन्य कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला असेल तर त्यांच्यामध्ये सार्स-सीओव्ही-२ लढण्याची क्षमता असू शकते.
यापूर्वी २००३ मध्ये कोरोना विषाणूमुळे सार्सची साथ पसरली होती. मात्र त्यावेळी भारतात सार्सचा फार फैलाव झाला नव्हता. मात्र जगातील इतर भागात जगभरात फैलाव झाला होता.
अशा प्रकारे वाढते रोगप्रतिकार शक्ती
काही लोकांच्या शरीरात टी-सेल विकसित झालेले असतात. टी-सेल पेशींच्या आत जाऊन संसर्गाला मारण्याचे काम या सेल करतात. विषाणूमध्ये एक खास स्ट्रक्चरल प्रोटीन असते. जेव्हा विषाणू शरीरातील कुठल्याही सेलला बाधित करतो. तेव्हा नॉन-स्ट्रक्चरल व्हायरल प्रोटीन तयार होते. टी-सेल या दोघांनाही ओळखता येऊ शकते.
१७ वर्षांनंतरही शरीरात उपस्थित होते टी-सेल
२००३ मध्ये झालेल्या सार्सच्या फैलावानंतर १७ वर्षांनंतरही काही लोकांमध्ये टी-सेल शरीरात उपस्थित होत्या. तसेच या सेल सार्स-सीओव्ही-२ च्या संसर्गालाही ओळखत होत्या. इतकेच नव्हे तर ज्या रुग्णांना सार्स किंवा कोविड-१९ चा संसर्ग झालेला नसेल, अशांमध्येदेखील टी-सेल दिसून आल्या आहेत. तसेच कोविड-१९ मधून सावरलेल्या रुग्णांमध्ये अशा टी-सेल होत्या त्या विषाणूच्या स्ट्रक्चरल प्रोटिनला एनएसपीपेक्षा चांगल्या पद्धतीने ओळखत होते.
त्यामुळे निरोगी लोकांमध्येही टी-सेल आहेत उपस्थित
संशोधनातून समोर आलेली विशेष बाब म्हणजे ज्या लोकांना आधीच कुठलाही संसर्ग झालेला नाही त्यांच्यामध्येही टी-सेल दिसून आले आहेत तसेच ते सार्स-सीओव्ही-२ ला ओळखत होते. तसेच जनावरांमध्ये दिसून येणाऱ्या कोरोना विषाणूमध्ये असलेल्या एनएसपीच्या सीक्वेंसला हे टी-सेल ओळखत होते. त्यामुळे मोठ्या संख्येमध्ये लोकांमध्ये कोरोना विषाणूमध्ये लढण्याची क्षमता विकसित झाली आहे.
मानवामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग पूर्वीपासून होत आला आहे. मात्र सार्स-कोव्ह-२ विषाणूप्रमाणे कोरोनाचे सर्व विषाणू हे जीवघेणे नसतात. मात्र या कोरोना विषाणूंमुळे कोरोनाला ओळखणारे टी-सेल उपस्थित असतात.
त्यामुळे ऑक्सफर्डची लस ठरणार खास
काही दिवसांपूर्वी ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात कोरोनावरील लसीची माणसांवर करण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरली होती. ज्या लोकांमध्ये चाचणी घेण्यात आली त्यामुळे कोरोनाच्या संसर्गामुळे केवळ अँटीबॉडीच नाही तर टी-सेल सुद्धा विकसित झाल्या होत्या. साधारणपणे अँटिबॉडी विकसित झाल्यानंतर लस यशस्वी मानली जाते. मात्र टी-सेल मुळे जेवढी रोग प्रतिकारशक्ती विकसित होते तेवढी अँटीबॉडीमुळे तयार होत नाही.