Coronavirus: कोरोनाच्या दहशतीखालीच जगावं लागणार; लस मिळण्याची हमी नाही, WHO तज्ज्ञाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 03:40 PM2020-04-19T15:40:54+5:302020-04-19T15:45:49+5:30

चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोनानं संपूर्ण जगावर संकट निर्माण केलं आहे. आतापर्यंत २० लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर १ लाख ६० हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना व्हायरस झपाट्याने वाढत जात असून सध्यातरी या रोगावर कोणतंही औषध उपलब्ध नाही, दोन-तीन औषधांचे मिश्रण करुन कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

बहुतांश देशांनी कोरोनापासून वाचण्यासाठी लॉकडाऊनचा आधार घेतला आहे. कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे पण अद्याप त्याला यश मिळालं नाही. तोपर्यंत सोशल डिस्टेंसिंग हा एकमेव पर्याय सध्या कोरोनाशी लढण्यासाठी वापरला जात आहे.

मानवाला नजीकच्या काळात कोरोना विषाणूच्या धोक्यासह जीवन जगावे लागेल. लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमधील ग्लोबल हेल्थचे प्राध्यापक डेव्हिड नाबरो यांनी अशाप्रकारचा इशारा दिला आहे. नाबरो जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) दूत म्हणून कार्यरत आहेत. द गार्डियन डॉट कॉमच्या अहवालानुसार नाबरो यांनी सांगितले की कोरोनावर लस यशस्वीरित्या तयार होईल याची हमी नाही.

ग्लोबल हेल्थच्या प्राध्यापकांच्या मते, लोकांना नवीन वातावरणाशी जुळवून घेणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूची लस लवकरच येईल असे लोकांनी गृहित धरू नये.

डेव्हिड नाबारो म्हणाले की, 'मूलत: प्रत्येक विषाणूविरोधात सुरक्षित आणि प्रभावी लस बनवता येत नाही. काही विषाणूचे लसीकरण तयार करणे फारच अवघड आहे. म्हणूनच, व्हायरसचा धोका लक्षात घेऊन आपल्याला आपले जीवन जगण्याचे नवीन मार्ग शोधावे लागतील.

'ज्या लोकांना या रोगाची लक्षणे आहेत त्यांना वेगळे करावे लागेल आणि जे त्यांच्या संपर्कात असतील त्यांना. ज्येष्ठांचे संरक्षण करावे लागेल. या आजारावर उपचार घेण्यासाठी रुग्णालयाची क्षमता वाढवावी लागेल असं संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ म्हणाले

यापूर्वी, डब्ल्यूएचओच्या अधिकाऱ्याने असेही म्हटले आहे की कोरोनाचा संसर्ग झाल्यावर असा कोणते पुरावे नाहीत ज्याने आजारापासून रोगप्रतिकारक बनले जाईल.

डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक माईक रायन म्हणाले की, कोणालाही माहिती नाही की ज्याच्या शरीरात अँन्टीबॉडीज असतात ते लोक आजारापासून पूर्णपणे सुरक्षित असतात.

दक्षिण कोरियामध्ये १०० पेक्षा जास्त कोरोना रुग्णांच्या उपचारानंतर त्यांना पुन्हा संसर्ग झाल्याची पुष्टी झाली. यानंतर आरोग्य विभागाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.