CoronaVirus : कोरोना विषाणू होणार 'कन्फ्यूज'; आगळ्या-वेगळ्या कोरोना लसीची चाचणी यशस्वी झाल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 05:59 PM2020-07-01T17:59:44+5:302020-07-01T18:12:03+5:30

कोरोना महामारीचा हाहाकार थांबवण्यासाठी जगभरात कोरोनावरील लस तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातच आता अमेरिकेच्या 'इनोवियो' नामक कंपनीने, INO-4800 नावाच्या लसीचे 40 लोकांवर करण्यात आलेले परीक्षण 94 टक्के यशस्वी ठरल्याचा दावा केला आहे.

न्यूज वेबसाइट टाइम्सनाऊ न्यूज डॉटकॉमने दिलेल्या वृत्तानुसार, 18 ते 50 वर्षांच्या 40 लोकांवर या लसीचे क्लिनिकल ट्रायल करण्यात आले. यासर्वांना चार आठवड्यांत लसीचे दोन डोस देण्यात आले. या लसीने संबंधित सर्व लोकांची रोग प्रतिकारशक्ती वाढवली असून कुणावरही प्रतिकूल परिणाम झालेला नाही.

कंपनीच्या सिनिअर व्हाइस प्रेसिडेंटने दिलेल्या माहितीनुसार, 10 जानेवारीला चीनच्या संशोधकांनी कोरोना व्हायरसचा जेनेटिक कोड जाहीर केला. यानंतर टीमने त्या सिक्वेन्सला सॉफ्टवेअरच्या माध्यमाने डीकोड केले आणि नतंर व्हॅक्सीनचा फॉर्म्यूला तयार केला.

ही डीएनए लस, कोरोना व्हायरसच्या स्पाइक प्रोटीन सारखेच प्रोटीन तयार करून व्हायरसला गोंधळात टाकेल. यानंतर, व्हायरस त्या प्रोटीनच्या जवळ जाताच व्हॅक्सीनच्या प्रभावामुळे निष्क्रीय होईल.

स्पाइक प्रोटीनमुळे मानवी शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढेल. या लसीमुळे स्पाइक प्रोटीन तयार होतील. यामुळे शरीर त्याला व्हायरस समजून अधिक संख्येने अँटीबॉडी तयार करेल. या प्रोटीनमुळे शरीराला कसल्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही. तर कोरोना व्हायरसच यामुळे नष्ट होईल.

तीन स्तरांवर मानवी ट्रायल यशस्वी झाल्यानतंर ही लस संबंधित देशाच्या औषध नियामक आयोगाकडे पाठवले जाईल. यानंतर त्या देशाचे सरकार लसीशी संबंधित प्रत्येक गोष्टीचा गांभीर्याने आणि बारकाईने अभ्यास करेल.

या काळात, लसीमुळे मानवावर काही दुष्परिणाम तर होत नाही ना, हे पाहिले जाते. यानतंर लसीच्या उत्पादनासाठी मंजुरी दिली जाईल. या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. मात्र, सध्या, कोरोना महामारी मोठ्या प्रमाणावर पसरली असल्याने 2 महिन्यांतही ही लस येऊ शकते.

कोरोना व्हायरस महामारीने संपूर्ण जगालाच कवेत घेतले आहे. या महामारीमुळे तब्बल एक कोटीहून अधिक लोक संक्रमित झाले आहेत. तर पाच लाखहून अधिक लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. एकट्या अमेरिकेत 27 लाख हून अधिक लोका कोरोना संक्रमित आहेत. तर तब्बल 1 लाख 30 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

Read in English