CoronaVirus Live Updates : बापरे! "कोरोना अजून गेलेला नाही, 'हा' व्हेरिएंट घडवू शकतो विध्वंस"; तज्ज्ञांचा सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 12:25 PM2022-03-22T12:25:00+5:302022-03-22T12:58:42+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. याच दरम्यान नव्या व्हेरिएंटमुळे चिंतेत भर पडली आहे.

कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. रुग्णांच्या आणि मृतांच्या वाढत्या संख्येने पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनापुढे अनेक प्रगत देश देखील हतबल झाले आहेत.

जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 47 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर 472,676,441 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 6,105,676 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. याच दरम्यान नव्या व्हेरिएंटमुळे चिंतेत भर पडली आहे. काही देशामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून पुन्हा एकदा लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

अमेरिकेतील शीर्ष संसर्गजन्य रोग तज्ञ डॉ. अँथनी फाउची यांनी लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. BA.2 व्हेरिएंट कोविड-19 च्या ओमायक्रॉन स्वरूपाचा एक अत्यंत संसर्गजन्य उप-प्रकार आहे. या व्हेरिएंटमुळे लवकरच अमेरिकेमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होऊ शकते.

काही ठिकाणी कोरोनाचा वेग मंदावला आहे तर काही ठिकाणी भीषण परिस्थिती आहे. अशातच कोरोना व्हायरस अजून गेलेला नाही. BA.2 हा नवा व्हेरिएंट विध्वंस घडवू शकतो असं म्हणत तज्ज्ञांनी धोक्याचा इशारा दिला आहे.

सीएनबीसीने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार फाउची म्हणाले की यूएसमध्ये नोंदवलेल्या नवीन प्रकरणांपैकी सुमारे 30 टक्के प्रकरणं या उपप्रकाराशी संबंधित आहेत.

BA.2 Omicron पेक्षा 60 टक्के जास्त संसर्गजन्य आहे, परंतु तो अधिक गंभीर दिसत नाही असंही म्हटलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र शर्थीचे प्रयत्न केले जात असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

फाउची यांनी रविवारी एबीसीच्या 'दिस वीक'मध्ये बोलताना सांगितलं की याची संसर्ग क्षमता वाढली आहे. मात्र जेव्हा तुम्ही या उपप्रकाराची प्रकरणं पाहता तेव्हा ती अधिक गंभीर स्वरूपाची दिसत नाहीत.

"या व्हायरसमुळे प्रकृती गंभीर होऊ नये, यासाठी लस आणि बूस्टर डोस हे सर्वोत्तम स्त्रोत आहेत. या उपप्रकारामुळे चीन आणि युरोपच्या काही भागात संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे" असं देखील म्हटलं आहे.

जगभरातील सर्वच देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. भारतीय मूळ असलेले अमेरिकन सर्जन जनरल विवेक मूर्ती यांनी रविवारी कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी निधीच्या कमतरतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

'फॉक्स न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, 'जेव्हा आपण बघतो की जगभरात काय घडत आहे आणि गेल्या दोन वर्षांतील अनुभवानुसार जगातील एखाद्या ठिकाणी कोरोनाची प्रकरणं वाढली तर इतर भागातही अनेकदा यात वाढ होताना दिसते."

"हे लक्षात घेऊन आपण सावधगिरी बाळगली पाहिजे कारण कोरोना महामारी अजून संपलेली नाही." चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. तर दक्षिण कोरियामध्ये देखील रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे.

"यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन" नुसार, शनिवारी कोविड महामारीची 31,200 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आणि 958 लोकांना कोरोना विषाणू संसर्गामुळे आपला जीव गमवावा लागला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असताना भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? भारताला नव्या व्हेरिएंटचा कितपत धोका असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याबाबत आता तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

भारतात वेगाने होणारं कोरोना लसीकरण आणि नॅचरल इम्युनिटी यामुळे येणाऱ्या काळात कोरोनाचा प्रभाव पाहायला मिळणार नाही. कोरोना मृतांच्या आणि नव्या रुग्णांचा आकडा कमी होणार असल्याचं देखील काहींनी म्हटलं आहे.

कोरोनाची दुसरी लाट अत्यंत धोकादायक ठरली होती. त्यामुळे लोकांनी हलगर्जीपणा करून नये. नियमांचं पालक करावं अन्यथा निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो असं देखील तज्ज्ञांनी म्हटलं आहे.