CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! ब्राझीलमध्ये एका दिवसात 4000 जणांचा मृत्यू; मृतदेह दफन करण्यासाठी नाही जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 05:42 PM2021-04-07T17:42:54+5:302021-04-07T17:57:56+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : ब्राझीलमध्ये कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली असून आरोग्य व्यवस्थेची भयावह स्थिती निर्माण झाली आहे.

कोरोनाचं संकट आता आणखी गडद होताना दिसत आहे. जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनामुळे सर्वत्र गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत.

जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल 13 कोटींचा टप्पा आता पार केला आहे. लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर काही देशांमध्ये अत्यंत भयावह स्थिती निर्माण झाली आहे.

ब्राझीलमध्ये कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली असून आरोग्य व्यवस्थेची भयावह स्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेनंतर कोरोनामुळे सर्वाधिक बाधित देशांमध्ये ब्राझीलचा समावेश होतो.

ब्राझीलमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून एका दिवसांत तब्बल 4 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक असल्याचं सांगितलं जात आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 4,195 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत ब्राझीलमध्ये कोरोना बळींची संख्या ही 3,37,000 वर गेली आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये कोरोनामुळे सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मंगळवारी देशात कोरोनाचे 86,979 नवीन रुग्ण समोर आले आहेत. वेळीच यावर उपाययोजना केली नाही तर या महिन्यात 1 लाख ब्राझील नागरिकांचा मृत्यू होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

अमेरिकेच्या ड्यूक यूनिवर्सिटीचे प्रोफेसर आणि ब्राझीलियन डॉक्टर मिगुएल निकोलिस यांनी हे एका न्यूक्लियर रिएक्टरप्रमाणे आहे. ज्यात चैन रिएक्शनची सुरुवात झाली आहे आणि आता हे नियंत्रणाबाहेर गेलं आहे. ही परिस्थिती फुकुशिमाप्रमाणे आहे. परिस्थिती इतकी कठीण झाली आहे की, मृतांना दफन करण्यासाठी जागा मिळणं कठीण झालं आहे असं म्हटलं आहे.

ब्राझीलमध्ये परिस्थिती गंभीर होत असताना देखील देशाचे राष्ट्राध्यक्ष जेयर बोलसोनारो यांनी लॉकडाऊन लागू करण्यासाठी नकार दिला आहे. येत्या काही दिवसांत मृतांचा आकडा अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

देशातील केवळ 3 टक्के लोकांना लसीकरणाचे दोन्ही डोस मिळू शकले आहेत. या कारणामुळे चिंता देखील वाढली आहे. धीम्या गतीने लसीकरण होत असल्याने परिस्थिती अधिक भीषण झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. सर्वात मोठं शहर असलेल्या असलेल्या साओ पाउलोमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांचे मृतदेह दफन करण्यासाठी कब्रिस्तानमध्ये आता जागाच शिल्लक राहिलेली नाही.

कोरोनामुळे भयावह परिस्थिती असून कर्मचाऱ्यांकडून जुने सांगाडे बाहेर काढण्यात येत आहेत आणि त्याठिकाणी नवीन मृतदेहांसाठी जागा तयार केली जात आहे. गेल्या एका आठवड्यात ब्राझीलमध्ये जवळपास 60 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

ब्राझीलमध्ये कोरोनाचे थैमान सुरू आहे. कोरोनामुळे झालेल्या मृतांचे अंत्यविधी करण्यासाठी कबरीतून सांगाडे उकरून काढावे लागत आहेत. एका ठिकाणी जवळपास हजारो सांगाडे बाहेर काढून मृतदेहांसाठी जागा तयार करण्यात आली आहे.

काही वर्षांपूर्वी दफन केलेल्या कबरींवरील वरील भाग काढण्यात येत असून तेथील सांगाडे काढण्यात येत आहे. साओ पालोमधील ब्राझीलमधील सर्वात मोठ्या कब्रस्तानापैकी एक असलेल्या विला फोरमोसा सिमेट्रीमध्ये कर्मचारी मास्क, पीपीई किट घालून दिवस-रात्र कबर खोदत आहेत.

ब्राझीलमधील या सर्वात मोठ्या शहरात अनेक कबरी खोदण्यात आल्या. मृतदेहांसाठी जागा अपुरी पडत होती. कोरोनामुळे मृतांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने कबरी खोदण्याचे काम अनेक ठिकाणी सुरू करण्यात आले आहे.

जगभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आता ब्राझीलमध्ये सापडत आहेत. तर सर्वाधिक मृत्यू देखील याच देशात होत आहेत. देशातील अनेक रुग्णालयांची क्षमता देखील संपुष्टात आली आहे. देशातील 26 पैकी 16 राज्यांमध्ये आयसीयू बेड्सची कमतरता निर्माण झाली आहे. 90 टक्के आयसीयू बेड्स रुग्णांनी व्यापले आहेत.

रिओ ग्रँड डो सुल येथे तर आयसीयू केअर युनिटमध्ये दाखल होण्यासाठी गेल्या दोन आठवड्यांत वेटिंग लिस्ट तब्बल दुपटीनं वाढली आहे. बेड्सच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना चक्क खुर्च्यांवर बसून उपचार घ्यावे लागत आहेत.

कोरोना लसीचा तुटवडा जाणवत असल्यामुळे ब्राझीलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री एर्नेस्टो अरेजो यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती जेर बोल्सनारो यांच्याकडे सोपवला आहे.

ब्राझीलसाठी जगभरातून आवश्यक त्याप्रमाणात कोरोना लस न मिळवणे हा एक कूटनितीक पराभव असल्याचं समजलं गेलं आहे. त्यामुळेच परराष्ट्र मंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.