coronavirus: या देशाने लपवले कोरोनाबळींचे आकडे, आतापर्यंत अधिकृत आकडेवारीपेक्षा तिप्पट रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 11:42 AM2020-08-03T11:42:14+5:302020-08-03T11:53:51+5:30

काही देशांनी कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकड्यांबाबत मोठ्या प्रमाणावर केली असल्याचे आता समोर येत आहे.

कोरोना विषाणूच्या फैलावाने सध्या संपूर्ण जगात थैमान घातले आहे. जगातील अनेक देशांमध्ये कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, काही देशांनी कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकड्यांबाबत मोठ्या प्रमाणावर केली असल्याचे आता समोर येत आहे.

कोरोनाचा चीनच्या बाहेर फैलाव होण्यास सुरुवात झाल्यावर कोरोनाचा सर्वाधिक प्रकोप वाढला होता तो इराणमध्ये. दरम्यान, इराणमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा मोठ्या प्रमाणावर लपवण्यात आल्याचा दावा एका रिपोर्टमधून करण्यात आला आहे.

इराणच्या आरोग्य मंत्रालयाने कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची जी आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. ती इराणधील एकूण कोरोनाबळींपेक्षा अर्ध्याहून कमी आहे, असा दावा बीबीसी फारसीने आपल्या वृत्तात केला आहे.

सरकारच्या अंतर्गत आकडेवारीमधून समजते की, २० जुलैपर्यंत इराणमध्ये कोरोनामुळे ४२ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र इराणचे आरोग्य मंत्रालय केवळ १४ हजार ४०५ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगत आहे, असे या वृत्तात म्हटले आहे.

इराण सरकारच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत देशातील कोरोनाबाधितांची संख्या ही ३ लाख ०९ हजार ४३७ एवढी आहे. तर मृतांची संख्या १७ हजार १९० सांगण्यात येत आहे. मात्र बीबीसीच्या वृत्तानुसार २० जुलैपर्यंत इराणमधील कोरोनाबाधितांची संख्या ही ४ लाख ५१ हजार ०२४ हून अधिक झाली आहे.

दरम्यान, इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी १८ जुलै रोजी एक धक्कादायक दावा केला होता. त्यांनी सरकारच्या अधिकृत आकडेवारीऐवजी एक वेगळीच आकडेवारी समोर ठेवली होती. इराणमध्ये २.५ कोटी लोक कोरोनामुळे संक्रमित झालेले असू शकतात, असे रुहानी म्हटले होते.

दरम्यान, ही आकडेवारी इराणच्या आरोग्य मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणामधून मिळाली असल्याचा दावा, रुहानी यांच्या कार्यालयाने केला होता.