कोरोना रुग्णांसाठी 1.5 रुपयांचं औषध ठरतंय लाभदायक, डॉक्टरांची आशा वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 09:45 PM2020-07-01T21:45:34+5:302020-07-01T21:57:47+5:30

डायबिटीज रुग्णांच्या उपचारांसाठी वापरण्यात येणारे Metformin औषध आता कोरोना रुग्णांसाठी सुद्धा लाभदायक ठरत आहे. चीनच्या वुहानमधील डॉक्टरांनी काही गोष्टींचा आधारे हे सांगितले आहे.

अमेरिकेच्या मिन्नेसोटा युनिव्हर्सिटीच्या संशोधकांचे म्हणणे आहे की Metformin औषधामुळे कोरोना रूग्णांच्या मृत्यूचा धोका कमी झाला आहे. मिन्नेसोटा युनिव्हर्सिटीने जवळपास सहा हजार रुग्णांवर स्टडी केली होती.

'द सन'ने दिलेल्या रिपोर्टनुसार, ब्रिटनची प्रमुख आरोग्य संस्था नॅशनल हेल्थ सर्व्हिस आधीपासून या औषधाचा वापर करत आहे. डायबेटिजसह-ब्रेस्ट कॅन्सर आणि हार्टच्या आजारावरही या औषधाचा लाभ होत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

हे औषध खूप स्वस्त आहे. भारतात Metformin 500 mg च्या एका टॅबलेटची किंमत 1.5 रुपये आहे. टाइप 2 डायबिटीजच्या उपचारांसाठी 1950 च्या दशकापासून या औषधाचा उपयोग करण्यात येत आहे.

वुहानच्या डॉक्टरांनी नुकतीच आपली स्टडी प्रकाशित केली. यामध्ये डायबिटीजचा आजार असणाऱ्या लोकांना कोरोनाची लागण झाली आणि ते Metformin औषध घेत होते. त्यामुळे हे औषध घेणाऱ्या रुग्णांचा मृत्यूदर कमी असल्याचे आढळून आले.

कोरोनामुळे गंभीर आजारी असलेल्या 104 रुग्णांचा डेटा अभ्यास डॉक्टरांनी केला, हे रुग्ण Metformin घेत होते. तर या रुग्णांच्या डेटाची तुलना कोरोनाच्या इतर 179 गंभीर रुग्णांशी करण्यात आली.

या स्टडीदरम्यान, वुहानमधील डॉक्टरांना असे आढळले की Metformin घेणाऱ्या केवळ 3 रुग्णांचा मृत्यू झाला. तर ज्यांनी हे औषध घेतले नाही, त्यामधील गंभीर अशा 22 कोरोना रूग्णांचा सुद्धा मृत्यू झाला.

काही स्टडीमधून असेही दिसून आले आहे की, लठ्ठपणा असलेले जे लोक डायबिटीजचे रुग्ण नाही, त्यांना हे औषध वजन कमी करण्यास देखील मदत करते. त्याच वेळी हे देखील निदर्शनास आले आहे की, लठ्ठपणा असलेल्या लोकांना कोरोनाची समस्या जास्त असते आणि त्यांचे मृत्यूचे प्रमाणही जास्त असते.

दरम्यान, जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिस वाढत आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी जगभरातील संशोधकांकडून औषध तयार करण्याचे काम सुरू आहे.