चिनी कोरोना लस घेऊन अनेक देश फसले! कूचकामी ठरल्यानं घ्यावा लागला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 10:53 AM2021-09-30T10:53:03+5:302021-09-30T11:01:00+5:30

Corona Vaccine : याचा परिणाम चीनच्या कस्टम डेटावर स्पष्टपणे दिसतो. यानुसार, चीनने जुलैमध्ये 2.48 अब्ज डॉलर किंमतीच्या लसी निर्यात केल्या होत्या. मात्र, ऑगस्ट महिन्यात ही नर्यात 21 टक्क्यांनी घटून 1.96 अब्ज डॉलरवर आली आहे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी आतापर्यंतचे सर्वात प्रभावी शस्त्र म्हणजे लस. भारताशिवाय चीननेही आपली कोरोना लस अनेक देशांना पुरवली. एवढेच नही, तर काही देशांत केवळ सिनोव्हॅक बायोटेक लिमिटेडने तयार केलेल्या चिनी लसीच्या माध्यमानेच लसीकरण करण्यात आले. मात्र, डेल्टा व्हेरियंटचा झपाट्याने प्रसार झाल्याने, या लसीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी झाला आणि आता अनेक देश चिनी बनावटीच्या लसीऐवजी अमेरिका आणि युरोपियन देशांकडून लस खरेदी करत आहेत. (Corona Vaccine Chinas corona vaccine export drops as many nation don't find it reliable against delta variant)

याचा परिणाम चीनच्या कस्टम डेटावर स्पष्टपणे दिसतो. यानुसार, चीनने जुलैमध्ये 2.48 अब्ज डॉलर किंमतीच्या लसी निर्यात केल्या होत्या. मात्र, ऑगस्ट महिन्यात ही नर्यात 21 टक्क्यांनी घटून 1.96 अब्ज डॉलरवर आली आहे.

फायझर आणि मॉडर्ना यांनी तयार केलेली लस पूर्वी केवळ श्रीमंत देशांमध्येच दिली जात होती. मात्र, आता हळूहळू या लसींची निर्यात आशिया, लॅटिन अमेरिका आणि मध्य पूर्वेतही वाढली आहे.

परराष्ट्र धोरण आणि सार्वजनिक आरोग्यावर अनेक पुस्तके संपादित करणारे हाँगकाँग विद्यापीठाचे प्राध्यापक निकोलस थॉमस यांनी म्हटले आहे, की 'वैद्यकीय व्यवसायिकांव्यतिरिक्त, आता सामान्य जनताही जागरूक झाली आहे. आता त्यांनाही लसीतील फरक कळला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व लसी सारख्या नसतात, हे त्यांच्या लक्षात आले आहे.

क्लिनिकल चाचण्यांमध्ये चिनी बनावटीची लस 50 ते 80 टक्के प्रभावी असल्याचे आढळून आले होते. परंतु ती कोरोनापासून संरक्षण देण्यासाठी mRNA लसींच्या तुलनेत फार मागे आहे. याचबरोबर, वेगाने पसरणाऱ्या डेल्टा प्रकारानंतर, चिनी लसीच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न चिन्ह उपस्थित केले गेले आहे.

देशात सिनोव्हॅक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना अॅस्ट्राजेनेकाचा डोस देण्याची घोषणा करणारा थायलंड हा पहिला देश होता. एवढेच नाही, तर चिनी लसीच्या तुलनेत अमेरिकी अथवा यूरोपीयन लस अधिक प्रभावी असल्याचे अनेक संशोधनातून आढळून आले आहे.

थायलंडमध्ये नागरिकांनी चिनी लसीविरोध निदर्शनेही सुरू केली. यानंतर, थायलंड सरकारने सिनोव्हॅकची ऑर्डर रद्द करून पाश्चात्य देशांनी तयार केलेली लस खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.

अमेरिकन राष्ट्रपती ज्यो बायडेन यांच्याकडून 1.1 अब्ज एमआरएनए लसीचे डोस, यूरोपकडून लाखो-कोट्यवधी डोस देण्याची घोषणा झाल्यामुळे, आता अनेक देशांच्या सरकारांनी चिनी लसींकडे पाठ फिरविली आहे. याच बरबोर भारतानेही पुढील महिन्यापासून एस्ट्राजेनेका लसीच्या निर्यातीवरील लादण्यात आलेली बंदी उठविण्याचा निर्णय झेला आहे.