Corona Vaccine : चिंताजनक! 'कोरोना लस न घेतलेल्यांना मृत्यूचा धोका दहापट जास्त'; रिसर्चमधून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 02:51 PM2021-09-13T14:51:59+5:302021-09-13T15:03:43+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : लोकांमध्ये कोरोना लसीबाबत अद्यापही थोडी भीती आहे. लसीच्या साईड इफेक्टच्या काही घटना समोर येत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 22 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मास्क, सोशल, डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन, आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. याच दरम्यान लसीकरण देखील वेगाने सुरू आहे. मात्र अद्यापहीअशई अनेक लोक आहेत. ज्यांनी कोरोना लसीचा डोस घेतलेला नाही.

लोकांमध्ये कोरोना लसीबाबत अद्यापही थोडे भीतीचे वातावरण आहे. लसीच्या साईड इफेक्टच्या काही घटना समोर येत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अशातच कोरोनाबाबतच्या रिसर्चमधून मोठा खुलासा करण्यात आला आहे. लस न घेतलेल्यांच्या मृत्यूचं प्रमाण दहापट अधिक असल्याचं म्हटलं आहे.

रिसर्चमधून कोरोनाची लस घेतलेल्या नागरिकांच्या तुलनेत लस न घेणाऱ्या नागरिकांच्या मृत्यूचं प्रमाण हे दहापट अधिक असल्याचं सिद्ध झालं आहे. युएस सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेनं अमेरिकेतील विविध भागांत हा प्रयोग केला आहे.

कोरोना लसीच्या रिसर्चसाठी 13 विविध राज्यं आणि शहरांतील 6 लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्णांचे रिपोर्ट्स, त्यांच्या आजारांचं गांभीर्य, रुग्णालयामध्ये दाखल होण्याचं प्रमाण आणि मृत्यूचे आकडे या बाबींचं सर्वेक्षण केलं. 4 एप्रिल ते 17 जुलै या कालावधीत 18 वर्षांवरील नागरिकांचे नमुने यासाठी तपासण्यात आले.

समोर आलेल्या निष्कर्षांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या नागरिकांच्या मृत्युचं प्रमाण हे लस न घेतलेल्यांच्या तुलनेत लक्षणीयरित्या कमी आढळून आलं आहे. कोरोना लसींची परिणामकारकता सुरुवातीला 90 टक्के होती. मात्र डेल्टाच्या प्रसारानंतर ती कमी होत जाऊन 80 टक्क्यांवर आल्याचं निरीक्षणही यात नोंदवण्यात आलं आहे.

विशेषतः ज्या रुग्णांना रुग्णालयामध्ये दाखल करावं लागलं, त्यातील लस न घेतलेल्या रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण हे लस घेतलेल्यांच्या तुलनेत अधिक असल्याचं दिसून आलं. कोरोनाबाबत केल्या गेलेल्या आणखी एका विश्लेषणात मॉडर्नाची लस ही फायझर आणि जॉन्सन अँड जॉन्सनच्या तुलनेत अधिक प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी आता खूशखबर आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका तब्बल 11 पटीने कमी असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. रुग्णालयात भरती होण्याचा धोका देखील कमी झाला आहे.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी देशामध्ये एका एक्शन प्लॅनची घोषणा केली असून लसीकरणासंदर्भात काही निर्देश जारी केले आहेत. अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांना रुग्णालयात भरती होण्याची शक्यता ही 10 पटीने कमी झाली आहे. तर मृत्यूचा धोका 11 पटीने कमी झाला आहे.

सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या वतीने तीन नवीन पेपर जारी करण्यात आले आहेत. यामधील एका पेपरमध्ये याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. सीडीसीच्या रॉशेल वॉलेंस्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिसर्चमध्ये लसीकरण काम करत असल्याचं समोर आलं आहे.

अमेरिकेच्या 13 क्षेत्रांमध्ये 4 एप्रिल ते 19 जून दरम्यान लाखो लोकांची तपासणी करण्यात आली. लसीकरणाच्या नव्या अभियानात सर्वात आधी वयोवृद्ध लोकांना डोस देण्यात येणार आहे. जून ते ऑगस्ट दरम्यान 400 हून अधिक रुग्णालयात याबाबत रिसर्च करण्यात आला आहे.

कोरोना लसीकरण अत्यंत महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. लसीकरणाचा चांगला परिणाम होत असल्याचं म्हटलं आहे. आतापर्यंत जगभरात कोट्यवधी लोकांनी लसीचे डोस घेतले आहेत. जगातील अनेक देशात लसीकरणाची मोहीम वेगाने सुरू आहे.