CoronaVirus News: चीनने तयार केली आणखी एक कोरोना व्हॅक्सीन; सुरक्षित आन् परिणामकारक असल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 23:02 IST2020-06-28T22:52:38+5:302020-06-28T23:02:18+5:30

चीनने आखणी एक कोरोना व्हॅक्सीन तयार केल्याचा दावा केला आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, चायना नॅशनल बायोटेक ग्रुपने (सीएनबीजी) रविवारी यासंदर्भात माहिती दिली. सीएनबीजीने म्हटले आहे, की माणसांवर करण्यात आलेल्या परीक्षणाचे रिझल्ट आले आहेत. क्लिनिकल ट्रायलमध्ये ही व्हॅक्सीन सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचे निदर्शनास आले आहे.

चायना नॅशनल बायोटेक ग्रुपने तयार केलेली ही दुसरी कोरोना व्हॅक्सीन आहे. या कंपनीने बिजिंग येथील युनिटमध्ये ही व्हॅक्सीन तयार केली आहे. यापूर्वी कम्पनीने वुहानच्या युनिटमध्ये एक व्हॅक्सीन तयार केली होती.

सीएनबीजीने चिनी सोशल मिडिया WeChatवर यासंदर्भात माहिती दिली. क्लिनिकल ट्रायलच्या फेज 1/2 मध्ये 1,120 निरोगी लोकांना ही व्हॅक्सीन देण्यात आली होती. ज्या लोकांना ही व्हॅक्सीन देण्यात आली, त्या संर्वांमध्ये मोठ्या प्रमाणावर अँटीबॉडीज तयार झाल्याचे दिसून आले आहे.

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, चिनी कंपन्यांना आणि रिसर्चर्सना आतापर्यंत आठ कोरोना व्हॅक्सीन कॅन्डिडेटसाठी मानवी परीक्षणाची मंजुरी मिळाली आहे. यावरून असेही म्हटले जाऊ शकते, की यशस्वी व्हॅक्सीन तयार करण्याच्या बाबतीत चीन बराच पुढे आहे.

चायना नॅशनल बायोटेक ग्रुपला चीनची सरकारी कंपनी चायना नॅशनल फार्मास्युटिकल ग्रुपची मान्यता मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी, याच महिन्यात सीएनबीजीने एक कोरोना व्हॅक्सीन तयार केली असल्याची माहिती दिली होती. ती व्हॅक्सीन वुहान येथील युनिटमध्ये तयार करण्यात आली होती.

कोणत्याही व्हॅक्सीनने पहिला आणि दुसरा टप्प्या पार केल्यानंतर, तिचे तिसऱ्या टप्प्यात चांगले रिझल्ट येणे आवश्यक असते. तिसऱ्या टप्प्यात हजारो लोकांना वॅक्सीन दिली जाते. तिसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतरच सर्वसामान्यांना व्हॅक्सीन दिली जाते.

सीएनबीजीने मंगळवारी म्हटले होते, की ते आपल्या व्हॅक्सीनचे तिसऱ्या टप्प्यावरील ट्रायल संयुक्त अरब अमीरातमध्ये करणार आहेत. मात्र, कोणती व्हॅक्सीन तेथे टेस्ट केली जाईल हे कंपनीने अद्याप स्पष्ट केलेले नाही.

















