By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 08:52 IST
1 / 10भारत आणि अमेरिकेतील ट्रेड डिलमुळे जागतिक पातळीवर अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात प्रामुख्याने भारताचा विश्वासू मित्र असलेला रशिया आणि पाकिस्तान यांच्यातील जवळीक वाढल्याचे दिसून येते. पाकिस्तान आणि रशिया यांच्यातील संबंधाकडे जगाचे आणि प्रामुख्याने भारताचे लक्ष वेधले आहे.2 / 10रशिया आणि पाकिस्तान यांच्यात मागील आठवड्यात तुर्की येथे झालेल्या एका बैठकीत थेट जमीन आणि हवाई संपर्क बनवण्यावर सहमती झाली आहे. हे दोन्ही देश आता केवळ व्यापारापुरते संबंध मर्यादित ठेवणार नाहीत तर रशिया पाकिस्तानला JF 17 लढाऊ विमानाचे इंजिन पुरवठा करण्याचीही चर्चा सातत्याने सुरू आहे. चीनच्या मदतीने निर्मित होणाऱ्या पाकिस्तानच्या या विमानांना रशियाचे इंजिन लागणार आहे.3 / 10पाकिस्तान आणि रशिया यांनी थेट जमीन आणि हवाई संपर्क वाढवून प्रादेशिक व्यापार, आर्थिक उलाढाली वाढवण्यावर भर देत आहे. इस्तंबूलमध्ये झालेल्या ओआयसी वाहतूक मंत्र्यांच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी मंत्री अब्दुल अलीम खान आणि रशियाचे मंत्री दिमित्री स्टॅनिस्लावोविच झ्वेरेव्ह यांच्यात बैठक पार पडली. त्यात मॉस्को-इस्लामाबाद थेट उड्डाणे सुरू करण्यासह व्यावहारिक पावले विलंब न करता सुरू करावीत यावर भर देण्यात आला.4 / 10रशियाचे मंत्री दिमित्री स्टॅनिस्लावोविच झ्वेरेव्ह यांनी अलीम यांना १ ते ३ एप्रिल २०२६ काळात ऐतिहासिक रशियन शहर सेंट पीटर्सबर्ग येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय वाहतूक आणि लॉजिस्टिक्स फोरममध्ये सहभागी होण्यासाठी औपचारिकपणे आमंत्रित केले. अब्दुल अलीम खान यांनी वाहतूक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज अधोरेखित केली आणि पाकिस्तान रस्ते नेटवर्क आणि लॉजिस्टिक्स कॉरिडॉरच्या विकासात रशियासोबत सहकार्य करण्यास उत्सुक आहे असं त्यांनी सांगितले. 5 / 10रशिया पाकिस्तानला RD 93MA इंजिन पुरवठा करण्याच्या मुद्द्यावरून भारतातही चर्चेला तोंड फुटले आहे. रशिया जो भारताचा पारंपारिक जुना आणि विश्वासू मित्र आहे तो आता पाकिस्तानच्या बाजूने झुकतोय का असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. ओआरएफ रिपोर्टनुसार ही नवीन गोष्ट नाही, कारण रशियन मिलिट्री एक्सपर्ट दीर्घ काळापासून भारताशिवाय पाकिस्तानलाही शस्त्र पुरवठा करण्यावर जोर देत आहेत. आता त्याच विचाराचे परिणाम रशिया आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांतून दिसत आहे. परंतु रशियाला अजूनही पाकिस्तानवर खूप जास्त भरवसा नाही.6 / 10पाकिस्तान आणि रशिया यांच्यातील संरक्षण सहकार्य १९९० च्या दशकात वाढले होते, जेव्हा मॉस्कोकडून इस्लामाबादला SU 27 देण्याचा निर्णय झाला होता. मात्र त्यावेळी भारताने नाराजी व्यक्त करताच हा करार रद्द करण्यात आला. त्यानंतर मिसाइल, टँक, स्टिल्थ फ्रिगेट, आर्टिलरी गन खरेदी करण्याचा पाकिस्तानचा प्रस्ताव बारगळला. अलीकडच्या वर्षांत दोन्ही देशांमध्ये अनेक करार झाले आहेत. 7 / 10मागील काळापासून भारताने रशियाच्या मिलिट्री हार्डवेअरवरील निर्भरता कमी केली आहे तर दुसरीकडे रशियाने पाकिस्तानला डिफेन्स सप्लाय करण्यावर भर दिला आहे. मात्र पाकिस्तानची खरेदी क्षमता मर्यादित असल्याने मोठी अडचण आहे. त्याच वेळी पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणातील अनिश्चितता देखील मॉस्कोच्या शस्त्रास्त्र कराराबद्दल चिंता वाढवत आहे.8 / 10चीन आणि पाकिस्तान त्यांच्या लढाऊ विमानांसाठी रशियात बनलेल्या इंजिनावर निर्भर आहेत. RD 93 रशिया MiG-29 फायटर जेटमध्ये वापरण्यात येणारे RD 33 इंजिनचे एक्सपोर्ट व्हेरिएंट आहे. हे इंजिन चीन आणि पाकिस्तानच्या JF 17 थंडरसाठी डिझाईन करण्यात आले आहे. रशियाने २००७ साली पाकिस्तानला RD 93 इंजिन पुरवले होते.9 / 10रशिया-पाकिस्तान संवादातील आणखी एक पैलू म्हणजे संयुक्त लष्करी कवायती, ज्या आता नियमित झाल्या आहेत. द्रुझबा दहशतवादविरोधी सराव अभ्यास १५ ते २७ सप्टेंबर २०२५ दरम्यान रशियाच्या दक्षिणी लष्करी जिल्ह्यात झाला. दोन वर्षांचा अपवाद वगळता हा सराव सप्टेंबर २०१६ पासून नियमितपणे आयोजित केला जात आहे. 10 / 10रशिया आणि पाकिस्तानने नौदल सरावांना चौकटीत समाविष्ट केले आहे. मार्च २०२५ मध्ये रशियन आणि पाकिस्तानी नौदलांनी उत्तर अरबी समुद्रात 'अरबी मान्सून संयुक्त सराव' आयोजित केला. त्याचे उद्दिष्ट परस्पर कार्यक्षमता वाढवणे आणि सागरी सुरक्षा धोक्यांना तोंड देण्यासाठी संयुक्त वचनबद्धता दाखवून देणे हा आहे.