अर्ध्या जगाच्या डोक्यावर चिनी कर्जाचे ओझे, भारतातही आहे एवढी गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 07:38 PM2020-06-21T19:38:39+5:302020-06-21T20:00:08+5:30

भारतातच नव्हे तर जगातील १०० हून अधिक देशांमध्ये चीनने उत्पादने आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून आपले हातपाय पसरलेले आहेत.

लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांच्या घुसखोरीमुळे तसेच चिन्यांशी झालेल्या झटापटीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आल्याने संपूर्ण देश सध्या संतप्त झालेला आहे. दरम्यान, चिनी उत्पादनांवर बंदी घालण्याची मागणी होत असून, त्यासाठी सोशल मीडियावर अभियानही सुरू आहे. मात्र चीनवर बहिष्कार घालणे तितकेसे सोपे नाही. तसेच भारतातच नव्हे तर जगातील १०० हून अधिक देशांमध्ये चीनने उत्पादने आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून आपले हातपाय पसरलेले आहेत.

आर्थिक दृष़्ट्या कमकुवत शेजाऱ्यांना कर्जाच्या जाळ्यात ओढणे आणि सक्षम देशांसोबत वारंवार वाद उकरून काढणे हे धोरण चीनने अवलंबले आहे. या धोरणाच्या माध्यमातून चीनने जगातील सुमारे १५० हून अधिक देशात 1.5 ट्रिलियन डॉलर वाटले आहेत.

चीनने सुमारे १५० देशांना आतापर्यंत वाटलेले कर्ज हे जागतिक जीडीपीच्या एकूण पाच टक्के एवढे आहे. चीन सरकार आणि त्याच्या सहाय्यक कंपन्या अन्य देशांना एकूण १.५ ट्रिलियन डॉलरचे कर्ज दिले आहे.

एवढेच नव्हे तर चीन हा आता जागतिक बँक आणि आयएमएफपेक्षा मोठा कर्जदाता बनला आहे. सन २००० ते २०१४ दरम्यान, अमेरिकेने अन्य देशांना सुमारे ३९४.६ अब्ज डॉलर एवढे कर्ज दिले होते. तर याच काळात चीनने ३५४.४ अब्ज डॉलर एवढे कर्ज कमकुवत देशांमध्ये वाटले होते. नंतरच्या वर्षांमध्ये जेव्हा अमेरिकेने कर्जवाटपात कपात केल्यानंतर चीन कर्जवाटप करणारा मोठा देश बनला.

जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि सर्व आंतरराष्ट्रीय वित्तीस समुहांनी मिळून वाटलेले कर्ज हे चीनने वाटप केलेल्या एकूण कर्जापेक्षा कमी आहे. चीनने बहुतांश देशांना पायाभूत सुविधांचे बांधकाम, ऊर्जा आणि खणकाम अशा गोष्टींसाठी कर्ज दिले आहे. चीन या गोष्टींचा अप्रत्यक्षपणे आपल्या फायद्यासाठी कधीही वापर करू शकतो.

२००५ मध्ये चीनने ५० हून अधिक विकसनशिल देशांना दिलेले कर्ज हे त्याच्या जीडीपीच्या १ टक्क्याहून कमी होते. मात्र २०१७ मध्ये हे प्रमाण वाढून १५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

भारताचा विचार केल्यास चीनने भारतामध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. २०१४ पर्यंत चीनने भारतात १.६ अब्ज डॉलर एवढी गुंतवणूक केली होती. मात्र नंतरच्या तीन वर्षांत ही गुंतवणूक वाढून ८ अब्ज डॉलर एवढी झाली आहे.

यामध्ये चीनने भविष्यातील गुंतवणुकीबाबत जी योजना विचारता घेतली तर चीनच्या भारतातील गुंतवणुकीचा आकडा हा २६ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचतो.

आता चीनच्या इतर देशांसोबत सुरू असलेल्या विवादांचा विचार केला तर याची यादीसुद्धा खूप मोठी आहे. भारतासोबतच चीनचा जपान, व्हिएतनाम, अमेरिका, मलेशिया आदी देशांसोबत वाद आहे. तसेच चीन आणि तैवानमध्येही गंभीर तणाव निर्माण झालेला आहे.

भारताच्या वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार चीन भारतामध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रिक उपकरणे, ऑटो कंपोनेंट, फार्मास्युटिकल उत्पादने, केमिकल, टेलिकॉम, स्टीलसारखी उत्पादने निर्यात करतो.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या निर्माण झालेला तणाव अजून वाढला आणि दोन्ही देशांचे व्यापारी संबंध बिघडले तर याचा फटकाही भारताला बसणार आहे. दोन्ही देशातील व्यवसाय बंद झाल्यास आयातीच्या बाबतील चीनला १ टक्क्याचे नुकसान होईल. तर भारताचे १४ टक्के नुकसान होईल. तर निर्यातीच्याबाबतीतही काहीशी अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.