"Pfizer ची कोरोना लस घेतली तर लोक मगर होतील, स्त्रियांना दाढी येईल", ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केली शंका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 12:07 PM2020-12-20T12:07:18+5:302020-12-20T12:25:44+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर युद्धपातळीवर संशोधन सुरू असून अनेक ठिकाणी चाचण्यांना यश आले आहे.

जगभरात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल सात कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोनावर युद्धपातळीवर संशोधन सुरू असून अनेक ठिकाणी चाचण्यांना यश आले आहे. काही ठिकाणी कोरोना लसीच्या चाचणीला सुरुवात झाली असून त्याचे साईड इफेक्ट समोर येत आहेत.

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो यांनी कोरोना लसीवर जोरदार टीकास्त्र सो़डलं आहे. तसेच अजब दावा केला आहे. Pfizer ची कोरोना लस घेतली तर स्त्रियांना दाढी येईल असं म्हटलं आहे.

अमेरिकन कंपनी फायझरने कोरोनावर लस विकसित केली आहे. मात्र ही लस घेतली तर लोक मगर होतील आणि महिलांना दाढी येईल अशी शंका राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केली आहे.

बोल्सोनारो हे कोरोना व्हायरसची तीव्रता आधीपासूनच नाकारत आले आहेत. या आठवड्यात त्यांनी देशात लसीकरण सुरू झालं तरी आपण ही लस घेणार नसल्याचं जाहीर केलं आहे.

बोल्सोनारो यांनी फायझरबरोबरच्या करारामध्ये हे स्पष्ट झालं आहे की, आम्ही (कंपनी) कोणत्याही दुष्परिणामांसाठी जबाबदार नाही. जर आपलं रुप बदलून तुम्ही मगर झालात तर ही आपली समस्या असल्याचं म्हटलं आहे.

ब्राझीलमध्ये कित्येक आठवड्यांपासून कोरोना लसीची चाचणी सुरू आहे आणि लोकांना ब्रिटन आणि अमेरिकेमध्येही लस दिली जात आहे. ते पुढे म्हणाले, ही लस घेतल्यानंतर जर तुम्ही सुपरह्युमन झाला, स्त्रियांना दाढी आली किंवा पुरुष स्त्रियांच्या आवाजात बोलू लागले तर ते त्याची जबाबदारी घेणार नाही असं म्हटलं आहे.

देशात लसीकरण कॅम्पेनची सुरुवात करीत बोल्सोनारो यांनी सांगितलं की, लस मोफत असेल मात्र अनिवार्य नाही. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की, लस घेणं गरजेचं आहे, मात्र लोकांना लस अनिवार्य करू शकत नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

ब्रिटननंतर आता अमेरिकेतही कोरोनाच्या लसीमुळे दोन आरोग्य कर्मचारी आजारी पडल्यामुळे प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. युएस सेंटर्स फॉर डिजीस कंट्रोल आणि प्रिवेंशनने संपूर्ण प्रकरणाची खोलवर तपासणी केली जात आहे. सीडीसीने धोक्याची सुचना देत सांगितले की, कोरोना व्हायरसची लस दिल्यानंतर ज्या व्यक्तीमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणं दिसून आली त्यांना दुसरा डोस दिला जाणार नाही.

सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार लस दिल्यानंतर तर एलर्जी थांबण्यासाठी औषधं द्यावी लागली, एपिनेफ्रिन दयावी लागली किंवा व्यक्तीला रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली तर या स्थितीला रिएक्शनचे सिरीयस केस असं म्हटलं जात आहे. ज्या लोकांना कोरोनाची लस दिली तसंच गंभीर लक्षणं दिसत असतील तर त्यांनी पुन्हा एकदा लस घेण्याआधी विचार करायला हवा.

अमेरिकेतील खाद्य आणि औषध प्रशासनाकडून या एलर्जीच्या प्रकारांवर परिक्षण केलं जात आहे. फायझर-बायोएनटेक कोरोनाची लस दिल्यानंतर अशा प्रकारचे परिणाम दिसून आले होते.

अलास्कामध्ये फायझरची कोरोनाची लस दिल्यानंतर दोन आरोग्य कर्मचारी आजारी पडले. त्याच्यावर लसीचे गंभीर एलर्जीक परिणाम झाले. लस दिल्यानंतर केवळ 10 मिनिटानंतर आरोग्य सेवकास एलर्जी झाली. अ‍ॅनाफिलेक्टिक लक्षणे अशा लोकांमध्ये आढळून आली आहेत.