'या' कारणाने हिरवा होत आहे अंटार्क्टिकातील पांढराशुभ्र बर्फ, वैज्ञानिकही झाले हैराण....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 03:53 PM2020-05-21T15:53:31+5:302020-05-21T15:57:09+5:30

आधी अंटार्क्टिकातील फोटो पांढरे येत होते. पण आता येथील बर्फात हिरव्या रंगाचं मिश्रण बघायला मिळत आहे. हा हिरवा रंग जास्तकरून अंटार्क्टिकातील काही भागांमध्ये आढळून येतोय.

अंटार्क्टिकामधील बर्फ वितळतोय हे तुम्हाला माहीत असेलच. पण आता येथीत पांढऱ्या शुभ्र बर्फाचा रंग बदलतो आहे. येथील बर्फाचा रंग अचानक हिरवा होऊ लागला आहे. हा अजब नैसर्गिक बदल बघून वैज्ञानिकही हैराण झाले आहेत. कारण हे कशामुळे होत आहे याची त्यांनाही कल्पना नाही. आता याचा शोध घेतला जात आहे. मात्र, काही वैज्ञानिक याला पेंग्विनला जबाबदार धरतात.

आधी अंटार्क्टिकातील फोटो पांढरे येत होते. पण आता येथील बर्फात हिरव्या रंगाचं मिश्रण बघायला मिळत आहे. हा हिरवा रंग जास्तकरून अंटार्क्टिकातील काही भागांमध्ये आढळून येतोय. काय माहीत येत्या काळात अंटार्क्टिकात सगळीकडे हिरव्या रंगाचा बर्फ बघायला मिळेल.

यूरोपियन स्पेस एजन्सीचे सेंटीनल-2 सॅटेलाइट दोन वर्षांपासून अंटार्क्टिकाचे फोटो घेत आहेत. हे फोटो पाहिल्यावर आणि तपासल्यावर कॅंब्रिज यूनिव्हर्सिटी आणि ब्रिटीश अंटार्क्टिका सर्व्हेच्या वैज्ञानिकांनी पहिल्यांदाच संपूर्ण अंटार्क्टिकामध्ये पसरत असलेल्या हिरव्या रंगाचा मॅप तयार केला.

वैज्ञानिकांना संपूर्ण अंटार्क्टिकात 1679 वेगवेगळ्या ठिकाणांवर हिरव्या रंगाच्या बर्फाचे पुरावे मिळाले आहेत. वैज्ञानिकांनी सांगितले की, अंटार्क्टिकामधील बर्फाचा रंग बदलण्याचं कारण एक समुद्री एल्गी आहे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी हिरवा रंग बघायला मिळतो आहे.

कॅंब्रिज यूनिव्हर्सिटीतील वैज्ञानिक मॅट डेवी यांनी सांगितले की, एल्गी म्हणजेच शेवाळ अंटार्क्टिकाच्या अनेक तटीय भागांमध्ये आढळून येत आहे. या शेवाळामुळे अंटार्क्टिकातील वातावरणातून कार्बन डायऑक्साइड कॅप्चर होत आहे.

मॅट डेवी यांनी सांगितले की, हा शेवाळ केवळ हिरव्या रंगांचाच नाही तर वेगवेगळ्या भागात नारंगी आणि लाल रंगाचा देखील आहे. आम्ही त्यावरही रिसर्च करणार आहोत.

आता अंटार्क्टिकातील बर्फात जे शेवाळ आढळून आलं ते मायक्रोस्कोपिक आहे. म्हणजे फार सूक्ष्म आहेत. पण कुठे कुठे ते इतकं जास्त आहे की, डोळ्यांनी दिसू शकतं.

मॅट डेवी यांनी सांगितले की, आम्ही अंटार्क्टिकातील एका पेंग्विन कॉलनीमध्ये पाच किलोमीटरच्या परिसरात 60 टक्के भागात हिरव्या रंगाचा शेवाळ पाहिला. वैज्ञानिकांचं मत आहे की, पेंग्विन आणि इतर काही प्राणी-जीवांच्या मलमूत्राने देखील हे विकसित झालं असेल.

मॅट म्हणाले की, असे असले तरी पेंग्विन अंटार्क्टिकात सगळीकडे नाहीत. त्यामुळे केवळ त्यांना दोष देणं चुकीतं ठरेल. जर क्लायमेट चेंजमुळे पृथ्वीवरील तापमान असंच वाढत राहिलं तर हे पांढरं विश्व हिरव्या रंगात बदलेल.

कारण एल्गी म्हणजे शेवाळ वाढण्यासाठी झीरो डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान पाहिजे. म्हणजे अंटार्क्टिकाच्या सामान्य तापमानापेक्षा हे अनेक पटीने जास्त आहे. शेवाळ अशा ठिकाणी जास्त वाढण्याची शक्यता असते जिथे वेगवेगळ्या प्रकारचे जीव-जंतू राहतात.