Tibet Bullet Train: ४७ बोगदे, १२१ ब्रीज आणि तिबेटचा दुर्गम भाग; चीनने ‘अशी’ सुरु केली बुलेट ट्रेन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 14:48 IST2021-07-12T14:44:24+5:302021-07-12T14:48:36+5:30
Tibet Bullet Train: स्थानिक पातळीवर ओळखली जाणारी यार्लुंग झॅंगबो नावाची ब्रह्मपुत्रा नदी ही रेल्वे १६ वेळा ओलांडते.

भारतात बुलेट ट्रेनचे स्वप्न कधी सत्यात उतरेल, हे कुणीही आजच्या घडीला सांगू शकत नाही. मात्र, अरुणाचल प्रदेशपासून काहीच अंतरावर असलेल्या तिबेटपर्यंत चीनने आपल्या बुलेट ट्रेन सेवेचा विस्तार केला.
चीनच्या या प्रकल्पामुळे भारतात काहीसे चिंतेचे वातावरण असून, आता अरुणाचल प्रदेश सीमेवर तणाव निर्माण होण्याची चिन्हे असल्याचे सांगितले जात आहे.
अरुणाचल प्रदेशच्या जवळ असलेल्या निंगची हे गाव आणि तिबेटची राजधानी ल्हासा यांना ही रेल्वे जोडते. तिबेट हा स्वायत्त प्रांत असून, सिचुआन-तिबेट रेल्वे सेक्शनच्या ल्हासा-निंगची या ४३५.५ किमी अंतरासाठी चीनने बुलेट ट्रेन सुरू केली आहे.
या रेल्वेचा वेग ताशी १६० किलोमीटर असून, ती सिंगल लाइन इलेक्ट्रिफाइड आहे. ल्हासासह नऊ स्टेशन्सवर ती थांबणार आहे. प्रवासी आणि मालवाहतूक अशी दोन्ही सेवा देणारी ही रेल्वे आहे. ल्हासा-निंगची रेल्वेने ल्हासा ते निंगची हा रस्ता मार्गे प्रवास पाच ते अंदाजे साडेतीन तास इतका कमी केला आहे.
या रेल्वेमार्गावर ४७ बोगदे आणि १२१ पूल आहेत आणि स्थानिक पातळीवर ओळखली जाणारी यार्लुंग झॅंगबो नावाची ब्रह्मपुत्रा नदी ही रेल्वे १६ वेळा ओलांडते.
एकूण रेल्वेमार्गाचा अंदाजे ७५ टक्के भाग हा बोगदे आणि पुलांनी व्यापलेला आहे. या रेल्वेची मालवाहतुकीची क्षमता वार्षिक दहा दशलक्ष टनांची आहे. यामुळे तिबेटचा विकास होईल आणि लोकांचे जीवनमान सुधारेल, असे म्हटले जात आहे.
किंगघई-तिबेट रेल्वेनंतर सिचुआन-तिबेट रेल्वे ही तिबेटमधील दुसरी सेवा आहे. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेट असल्याचा चीनचा दावा भारताने ठामपणे फेटाळून लावला आहे. भारत-चीन यांच्यातील सीमावाद हा ३,४८८ किलोमीटर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून आहे.
चीन- भारत सीमेवर कोणताही पेचप्रसंग निर्माण झाला, तर व्यूहरचनेच्यादृष्टीने आवश्यक साहित्य पुरवणे या रेल्वेने मोठे सोयीचे होईल, असे शिंघुआ युनिव्हर्सिटीतील नॅशनल स्ट्रॅटेजी इन्स्टिट्यूटच्या संशोधन विभागाचे संचालक किॲन फेंग यांनी म्हटले आहे.
या बुलेट ट्रेनमुळे ल्हासा आणि निंगचीचे अंतर अवघ्या दोन तासांवर आले आहे. ड्युअर पॉवर इंजिनामुळे विना वीजही ही बुलेट ट्रेन धावू शकते, असे सांगितले जात आहे.
बुलेट ट्रेनच्या या सेवेमुळे ४८ तासांचा प्रवास १३ तासांवर येणार आहे. नियंगची हा भाग अरुणाचल प्रदेशच्या जवळ असल्याचे सांगितले जात आहे.