NEET परीक्षेत अपयशी ठरली, मग UPSC ची तयारीही सोडली: आता ७२ लाखांचं पॅकेज घेणारी युवती आहे कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 10:56 IST2025-07-17T10:42:32+5:302025-07-17T10:56:15+5:30

कर्नाटकातील तीर्थहल्ली तालुक्यातील कोदूरू येथे राहणारी रितूपर्णा के.एस...जिला एकेकाळी आलेल्या अपयशामुळे तिचे स्वप्न भंगलं असं वाटायचे. तिने NEET परीक्षेत अपयश आले, त्यानंतर तिने यूपीएससीची तयारीही सोडून दिली. परंतु, वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी ब्रिटिश कंपनी रोल्स रॉयसकडून वार्षिक ७२.३ लाख रुपयांची ऑफर मिळाल्याने प्रसिद्धीझोतात आली आहे.

जेट इंजिन बनवणाऱ्या विभागात काम करणारी ती सर्वात तरुण महिला ठरली आहे. तिची कहाणी पूर्णपणे वेगळी आहे. वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणारी रितूपर्णा आता रोबोटिक्समध्ये पुढे जात आहे. सेंट एग्नेसमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने NEET परीक्षा देत सरकारी कोट्यातून MBBS ची जागा मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु मिळालेल्या अपयशामुळे रितूपर्णा निराश झाली.

एका मुलाखतीत तिने सांगितले की, "माझे स्वप्न डॉक्टर बनण्याचे होते, पण, वडिलांच्या प्रोत्साहनामुळे मी अभियांत्रिकीकडे वळली. तिने २०२२ मध्ये CET द्वारे मंगळुरू येथील सह्याद्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट (SCEM) मध्ये प्रवेश घेतला. त्यात प्लॅन बी म्हणून सुरू केलेले काम लवकरच तिचा छंद बनला.

'कॉलेजच्या पहिल्या दिवसापासूनच मी एक्सप्लोर करायला सुरुवात केली असं रितूपर्णाने म्हटलं. ऑटोमेशनमधील आवडीमुळे तिने रोबोटिक्स आणि ऑटोमेशन अभियांत्रिकीकडे वाटचाल केली. वरिष्ठांच्या कामाने प्रेरित होऊन तिने लवकरच असे प्रकल्प तयार करण्यास सुरुवात केली जे वास्तविक जगात उपयोगी येतील.

रितूपर्णा आणि तिच्या टीमने मिळून सुपारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी रोबोटिक स्प्रेअर आणि हार्वेस्टर तयार केले. गोव्यात झालेल्या आयएनएक्स आंतरराष्ट्रीय परिषदेत या प्रयोगाने तिने सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकली. या स्पर्धेत जपान, सिंगापूर, रशिया आणि चीनमधील स्पर्धकांनीही भाग घेतला होता.

तिने एनआयटीके सुरथकल येथे रोबोटिक सर्जरीवरील संशोधनातही योगदान दिले. घनकचरा व्यवस्थापनासाठी मोबाईल अॅप तयार करण्यास मदत केली. या दरम्यान त्यांनी दक्षिण कन्नडचे उपायुक्त मुल्लई मुहिलन एमपी यांच्याशी थेट संवाद साधला.

जगात स्वतःचे नाव कमावायचे असल्याने रितूपर्णाने रोल्स रॉयसशी इंटर्नशिपसाठी अर्ज केला. कंपनीने सुरुवातीला तिला नकार दिला, कारण ती एका महिन्यात एकही काम पूर्ण करू शकणार नाही. मात्र कंपनीकडे तिने एक संधी मागितली तेव्हा कंपनीने तिला एक महिन्याची मुदत देऊन एक चॅलेंज दिले. त्यानंतर कंपनीचे काम तिने ते फक्त एका आठवड्यात पूर्ण केले.

तिच्या कार्यक्षमतेने प्रभावित होऊन कंपनीने तिला आणखी कठीण कामे दिली. अशा प्रकारे आठ महिन्यांचा एक संघर्षमय प्रवास सुरू झाला ज्यामध्ये काम आणि मुलाखती दोन्हींचा समावेश होता. हे सर्व करत असताना ती कॉलेजच्या सहा सेमेस्टरही देत होती. यूकेच्या कामाच्या वेळेनुसार काम करण्यासाठी ती मध्यरात्री ते सकाळी ६ वाजेपर्यंत काम करत असे.

डिसेंबर २०२४ मध्ये रितूपर्णा हिला ३९.६ लाख रुपयांची प्री-प्लेसमेंट ऑफर मिळाली. एप्रिल २०२५ पर्यंत तिच्या कामगिरीची दखल घेऊन कंपनीकडून तिचा पगार वार्षिक ७२.३ लाख रुपये करण्यात आला. आता कॉलेजच्या सातव्या सेमेस्टरनंतर रितूपर्णा अमेरिकेतील टेक्सास येथे रोल्स रॉयसमध्ये पूर्णवेळ काम करण्यासाठी जाईल.

ती त्यांच्या जेट इंजिन उत्पादन युनिटमध्ये काम करेल. जगातील तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी प्रतिष्ठित डीसी फेलोशिप कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या दक्षिण कन्नडमधील १५ विद्यार्थ्यांपैकी ती एक होती. तिचे विभागप्रमुख प्रो. लॉरेन्स जोसेफ फर्नांडिस यांनी तिच्या यशाला कॉलेजसाठी 'अभिमानाचा क्षण' आणि देशभरातील इच्छुक अभियंत्यांसाठी प्रेरणास्थान असल्याचं म्हटले आहे.