By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 10:54 IST
1 / 9ही कहाणी एका संघर्षाची, कठोर परिश्रमाची अन् पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची...एक मुलगा, जो ११ वर्षांचा होता आणि सहावीत शिकत असताना त्याचे लग्न झाले होते. घरच्यांनी त्याचे शिक्षण रोखले पण डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहणे मुलाने सोडले नाही. 2 / 9कुटुंबातील लोकांकडून सातत्याने आडकाठी आणि नातेवाईकांकडून टोमणे सहन करावे लागले. या मुलाने अभ्यासासाठी घरही सोडले. तो चार वेळा वैद्यकीय प्रवेशासाठी लागणाऱ्या NEET परीक्षेत नापास झाला, पण त्याने हार मानली नाही. हा तरूण आहे रामलाल भोई...3 / 9एका मुलाखतीत रामलालने त्याच्या आयुष्याचा प्रवास उलगडला आहे. राजस्थानातील चित्तोडगड येथील घोसुंडा गावचा तो रहिवासी आहे. त्याच्या कुटुंबाने कधीच शिक्षणावर जास्त भर दिला नाही. तो ११ वर्षांचा असताना आणि सहावीत असताना त्याचे घरच्यांनी लग्न लावून दिले.4 / 9रामलालने दहावीच्या पुढे शिकू नये असं त्याच्या वडिलांना वाटत होते. मात्र अभ्यास सुरू ठेवण्याचा आग्रह रामलालने धरल्याने कुटुंबात वादही झाला. घरच्यांनी त्याला खडसावले परंतु रामलालने मागे पाऊल टाकले नाही. 5 / 9११वीत असताना त्याच्या एका मित्राने शेती विषय घेण्याचा निर्णय घेतला, म्हणून रामलालही त्याच्यासोबत गेला. सुरुवातीला त्याने कृषी अभ्यासात प्रवेश घेण्याचा विचार केला, परंतु तिथे आल्यावर शिक्षकांनी त्याला बायोलॉजी आणि NEET परीक्षेची माहिती करून दिली. त्यावेळी त्याला NEET म्हणजे काय हे देखील माहित नव्हते. २०१९ मध्ये त्याने ८१% गुणांसह १२वी उत्तीर्ण केले.6 / 9यानंतर त्याला जाणवले की, NEET परीक्षा उत्तीर्ण झाल्यास तो डॉक्टर बनू शकतो. जेव्हा तो कोटा इथे गेला तेव्हा गावातील लोकांनीही त्याला चिडवले. कुटुंबाने पुढचे शिक्षण घेऊ नको असं बजावले तरीही अभ्यास त्याचा छंद बनला होता. म्हणूनच रामलालने घर सोडण्याचा निर्णय घेतला. 7 / 9घर सोडून रामलाल उदयपूरला निघून गेला आणि तिथेच त्याने पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला. कालांतराने रामलालच्या मित्राच्या वडिलांनी त्याच्या घरच्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले तेव्हा त्याला कुटुंबाने शिक्षण घेण्याची परवानगी दिली. 8 / 9रामलालने NEET परीक्षेची तयारी सुरू ठेवली आणि पुढे परीक्षा दिली. २०१९ मध्ये त्याने पहिल्या प्रयत्नात ३५० गुण मिळवले. २०२० मध्ये तो दुसऱ्या प्रयत्नात आणि २०२१ मध्ये तिसऱ्या प्रयत्नात अयशस्वी झाला. चौथ्या प्रयत्नापूर्वीच त्याने क्लास लावला. परंतु २०२२ मध्ये त्याचा स्कोअर अजूनही कमी होता. या काळात त्याचे आयुष्य सोपे नव्हते. वयाच्या २० व्या वर्षी रामलाल केवळ पतीच नाही तर एका मुलाचा बापही बनला होता. 9 / 9रामलालने कठोर परिश्रम सुरू ठेवले आणि २०२३ मध्ये त्याचे स्वप्न पूर्ण झाले. वयाच्या २१ व्या वर्षी त्याने NEET UG परीक्षेत ६३२ गुण मिळवले. त्याचे ध्येय MBBS पदवी मिळवणे आणि त्याच्या सहा महिन्यांच्या मुलीचे भविष्य सुरक्षित करणे होते. MBBS पूर्ण केल्यानंतर तो डॉक्टर होईल आणि त्याच्या घरच्यांनाही त्याचा अभिमान वाटेल.