कोंबडीची पिसे पाहून सुचली भन्नाट कल्पना; युवक बनला कोट्यधीश, नेमकं काय केलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 09:35 AM2022-09-28T09:35:07+5:302022-09-28T09:38:36+5:30

कचर्‍यापासून कंपोस्ट किंवा कचर्‍यापासून वीज निर्मितीबाबत सर्वांनाच माहिती आहे, परंतु आपण जे कपडे घालतो ते देखील कचऱ्यापासून बनवता येतात याचा विचार केला आहे का? घरातून बाहेर पडणारा तो कचरा नव्हे, तर कोंबड्यांच्या पिसांचा कचरा, ज्याला कोणी हात लावू इच्छित नाही, परंतु त्यातून अतिशय मऊ कापड तयार केले जात आहे.

होय, हे जयपूरच्या मुदिता आणि राधेश या जोडप्याने केले आहे. कॉलेजमध्ये आलेली एक कल्पना या जोडप्याने आपल्या मेहनतीने आणि आवडीने कंपनीत रूपांतरित केली आणि आज या कंपनीची उलाढाल करोडोंमध्ये आहे.

मुदिता अँड राधेश प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका मुदिता यांनी सांगितले की, जेव्हा मी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्राफ्ट्स अँड डिझाईन, जयपूर येथून राधेशसोबत एमए करत होती, तेव्हा मला टाकाऊ वस्तूंपासून नवीन वस्तू बनवण्याचा प्रकल्प देण्यात आला होता. एके दिवशी राधेश शेजारच्या कसायाच्या दुकानात उभा राहून प्रोजेक्टचा विचार करत होता. तिथे त्याने कोंबडीच्या पिसांना हाताने स्पर्श केला. त्यांनी त्याच वेळी कसाईशी बोलून या कचऱ्याची दुकानातून दररोज मोठ्या प्रमाणात बाहेर निघत असल्याची माहिती घेतली.

डोक्यात हीच कल्पना ठेऊन राधेश आणि मुदिता यांनी प्रदीर्घ संशोधनानंतर हा त्यांचा प्रकल्प बनवला, जो नंतर त्यांच्या जीवनाचे ध्येय बनला. राधेश सांगतो की, त्यांनी हे काम केवळ १६ हजार रुपयांपासून सुरू केले, त्याला पुढे मोठे स्वरुप आले. गेल्या अडीच वर्षांत कंपनीने सुमारे ७ कोटींचा व्यवसाय केला असून सध्या कंपनीची वार्षिक उलाढाल अडीच कोटी आहे

राधेशचं कुटुंब स्वत: पूर्णपणे शाकाहारी असल्याने त्याने कुटुंबाशी या प्रकल्पाविषयी बोलला तेव्हा कुटुंबीयांनी नकार दिला. ते म्हणाले की, हे घाणेरडे काम आहे, अशुद्ध वस्तूंना ते कसे हात लावू शकतात. काम प्रगतीपथावर असतानाही कुटुंबाने राधेशला साथ दिली नाही. त्यांना आर्थिकदृष्ट्या दूरच पण कुटुंबाकडून भावनिक आधारही मिळाला नाही.

कॉलेजमध्ये प्रोजेक्टवर काम करत असताना त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. राधेश आणि मुदिता यांना स्वतःचे फॅब्रिक बनवण्यासाठी सुमारे ८ वर्षे लागली. २०१० पासून सुरू झालेला हा उपक्रम २०१८ मध्ये पूर्ण झाला. यासाठी खूप मेहनत आणि अभ्यास करावा लागल्याचे राधेशनं सांगितले. असे फॅब्रिक याआधी कोणीही बनवले नसल्याने, पुस्तकांत आणि इंटरनेटवरही त्याबद्दल फारशी माहिती नव्हती. खूप संशोधनानंतर त्याला कोंबडीची पिसे साफ करण्याची पद्धत सापडली.

राधेश आणि मुदिता यांना कॉलेजच्या काळापासूनच आव्हानांचा सामना करावा लागला. त्यांचे बहुतेक शिक्षक आणि प्राध्यापक त्यांच्या कामावर खूश नव्हते. कोंबडीच्या पिसांवर काम केल्यामुळे त्यांनी याला गलिच्छ काम म्हटले आणि त्यांना मदत करण्यास नकार दिला. अनेक शिक्षकांनी राधेशला नापासही केले. कॉलेज संपल्यानंतर माझ्या थिअरीला प्रॅक्टिकल रुप देणं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं.

राधेश सांगतो की, फंडपासून साफसफाईचे प्लांट लावणे, विणकर शोधणे, त्यांना काम करायला लावणे, त्यांना काम शिकवणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि अंतिम उत्पादन बाजारात आणणे अशा आव्हानांना तोंड देत त्यांनी कंपनी तयार केली आहे. केवळ आव्हानच नाही, तर अशी अनेक माणसे आणि परिस्थितीही आली जी त्यांच्या बाजूनेही होती असं जोडप्याने म्हटलं.

सध्या सुमारे १२०० कामगार कोंबडीच्या पिसांपासून उत्कृष्ट कापड बनवण्याचे काम करतात. राधेश आणि मुदिता सांगतात की प्रत्येक विणकर महिन्याला ८ ते १२ हजार रुपये कमावतो. आज, जिथे बहुतेक कंपन्या यंत्रांकडे वळल्या आहेत आणि विणकरांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत, मुदिता आणि राधेश यांनी अधिकाधिक विणकरांना सहभागी करून घेण्याचे आणि हात कामगारांना समाजात त्यांचे स्थान देण्याचे ध्येय ठेवले आहे.

मुदिता म्हणते की, भारतात त्यांचे फारसे ग्राहक नाहीत कारण लोक कोंबडीच्या पिसापासून बनवलेल्या शाल वापरण्यास टाळाटाळ करतात, परंतु परदेशात त्याला खूप मागणी आहे. त्यांची बहुतेक उत्पादने केवळ परदेशी देशांसाठीच बनवली जातात.