शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'O' रक्तगट आणि 'RH' निगेटिव्ह असलेल्या लोकांना कोरोनाचा धोका कमी, संशोधनातून उघड!

By ravalnath.patil | Published: December 03, 2020 8:33 PM

1 / 10
जर तुमचा रक्तगट ओ (O) आहे आणि रीसस निगेटिव्ह म्हणजे आरएच फॅक्टर निगेटिव्ह आहे, तर तुम्हाला कोरोनाचा धोका कमी असतो. इतकेच नाही तर कोरोनामुळे तुम्ही कधीही गंभीर आजारी पडणार नाही किंवा तुमचा मृत्यू होणार नाही, असा कॅनडाच्या वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे. यासंबंधीचा अहवाल अ‍ॅनल्स ऑफ इंटर्नल मेडिसीन या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.
2 / 10
कॅनडाच्या टोरोंटो विद्यापीठाच्या संशोधकांनी 225,556 लोकांच्या रक्तगटाचा अभ्यास केला आहे. जानेवारी 2007 ते डिसेंबर 2019 या कालावधीत त्यांच्या रक्तगटाचा अभ्यास करण्यात आला. यानंतर, त्यांच्या रक्ताच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. सर्व रक्त गट आणि आरएच फॅक्टर्सवर कोरोना संसर्गाचा अभ्यास करणे हे संशोधकांचे उद्दिष्ट्य होते.
3 / 10
अभ्यासानुसार, 225,556 लोकांपैकी 1328 लोकांना कोरोनाचा तीव्र संसर्ग झाला होता. हे सर्व लोक एबी, ए किंवा बी रक्तगटाचे होते. यापैकी बहुतेक लोकांचा आरएच फॅक्टर देखील पॉझिटिव्ह होता. यामुळे त्यांच्या शरीरात कोरोनाचा संसर्ग अधिक दिसून आला. तर, रक्त गट ओ आहे आणि रीसस निगेटिव्ह अर्थात आरएच निगेटिव्ह व्यक्तींमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. यामध्ये कोणीही गंभीर आजारी झाले नाही किंवा कोणाचाही मृत्यू झाला नाही.
4 / 10
‘द स्टेट्समॅन’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, आता रक्तगटानुसार लोकांना लस देऊन कोरोनापासून त्यांना वाचवू शकतात की नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करीत आहेत. हे शक्य असल्यास, बर्‍याच लोकांना कोरोनाच्या आजारापासून वाचविणे सोपे होईल. कारण, लस फक्त त्या लोकांनाच दिली जाईल, ज्यांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.
5 / 10
दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीस चीनमधून असाच एक अभ्यास समोर आला आहे. त्यातही चीनमधील जिनइंतान रुग्णालयाच्या संशोधकांनी खुलासा केला होता की, रक्तगट ए असलेल्या व्यक्तीला कोरोनामुळे त्वरीत संसर्ग होऊ शकतो, तर रक्तगट ओ असलेल्या व्यक्तीला संसर्ग होण्यास थोडा जास्त कालावधी लागतो.
6 / 10
चीनच्या वैज्ञानिकांनी वुहानमध्ये हा अभ्यास केला. वुहान ही चीनच्या हुबेई प्रांताची राजधानी आहे. येथून कोविड -19 कोरोना विषाणूचा संसर्ग जगभर पसरला. वुहानमधील वैज्ञानिकांनी कोरोना विषाणूने संक्रमित 2173 लोकांचा अभ्यास केला. यापैकी 206 लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला होता. या लोकांना हुबेई प्रांतातील तीन रुग्णालयात दाखल केले.
7 / 10
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 206 लोकांपैकी 85 जणांचा रक्तगट ए होता, म्हणजे सुमारे 41 टक्के. मात्र, 52 लोकांचा रक्त गट ओ होता, म्हणजे सुमारे 25 टक्के. 2173 लोकांमध्ये रक्तगट ए असलेल्यांना जास्त संसर्ग झाला. यामध्ये 32 टक्के रक्तगटाचे होते तर 26 टक्के रक्तगट ओ असलेले लोक होते.
8 / 10
या संशोधनात सामील झालेल्या सर्व लोकांपैकी 38 टक्के रक्तगट ए असलेल्या लोकांना संसर्ग झाला होता, तर केवळ 26 टक्के ओ रक्तगटाच्या लोकांना या कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. वैज्ञानिकांनी त्यांच्या संशोधनातून असा निष्कर्ष काढला आहे की, इतर रक्तगटाच्या तुलनेत ओ रक्तगट असलेल्यांचा मृत्यदर कमी आहे. तर रक्तगट ए असलेल्यांची कोरोनामुळे मृत्यूची शक्यता जास्त असते.
9 / 10
वैज्ञानिकांनी असेही म्हटले आहे की, जेव्हा सार्स-सीओव्ही -2 हल्ला झाला होता, तेव्हा रक्तगटाचे ओ लोक कमी आजारी होते, तर इतर रक्तगटाच्या लोकांवर लक्षणीय परिणाम झाला होता. चीनच्या टियानजिनमधील राज्य प्रयोगशाळेच्या प्रयोगात्मक रक्तविज्ञानाचे शास्त्रज्ञ गाओ यिंगदाई यांनी म्हटले आहे की, या संशोधनामुळे रोगाचा उपचार शोधण्यात मदत होईल.
10 / 10
गाओ यिंगदाई म्हणाले की, जर तुमचा रक्तगट ए असेल तर काळजी करण्याची गरज नाही. याचा अर्थ असा नाही की, आपण कोरोनामध्ये 100 टक्के संक्रमित व्हाल. रक्तगट ओ असलेल्या लोकांनीही निष्काळजीपणाने वागू नये. यापूर्वी बरेच संशोधन केले गेले आहेत की, ओ रक्तगटाच्या तुलनेत रक्तगट ए, बी आणि एबीच्या लोकांना हृदयरोग होण्याचा धोका जास्त असतो.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य