आता QR Code नं ओळखता येणार बनावट औषधं, केंद्र सरकारचं ऐतिहासिक पाऊल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 03:14 PM2022-01-20T15:14:43+5:302022-01-20T15:19:51+5:30

केंद्र सरकारनं बाजारात बनावट औषध विक्रीला आळा घालण्यासाठी जबरदस्त उपाय शोधून काढला आहे. सरकारनं नेमका काय तोडगा काढला जाणून घेऊयात...

देशात कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या वैद्यकीय क्षेत्राला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे. यातच औषधांची मागणी आणि पुरवठा देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पण यात बनावट औषध विक्रींचंही प्रमाण वाढलं आहे आणि यातून अनेकांच्या जीवावर बेतल्याचीही प्रकरणं आपण पाहिली असतील.

केंद्र सरकारनं आता बनावट औषधांना आळा घालण्यासाठी महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. औषध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अॅक्टीव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडिएंट्सवर (API) आता QR Code लावणं बंधनकारक केलं आहे.

QR कोडमुळे आता कोणतं औषध गुणवत्तापूर्ण आणि कोणतं बनावट आहे हे ओळखता येणार आहे. अवघ्या काही सेकंदात तुम्ही विकत घेत असलेलं औषध बनावट आहे का याची पडताळणी करुन शकणार आहात.

औषधाच्या पाकिटावर असलेला QR Code स्कॅन करुन औषधांची पडताळणी ग्राहकांना करता येणार आहे. नवा नियम १ जानेवारी २०२३ सालापासून लागू केला जाणार आहे.

नव्या नियमाबाबतचे नोटिफिकेशन आरोग्य मंत्रालयानं जारी केलं आहे. API मध्ये QR Code लावण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर आता औषधांच्या खरं-खोटेपणाची पडताळणी करणं अधिक सोपं होणार आहे. क्यूआर कोडमध्ये संबंधित औषधाची संपूर्ण माहिती असणार आहे. यात बॅच नंबर, सॉल्ट, किंमत अशी सर्व माहिती मिळणार आहे.

API वर QR कोड लावण्यात आल्यामुळे आता संबंधित औषध तयार करण्यासाठी कच्चा माल कुठून मागवण्यात आला आहे याचीही माहिती कळणार आहे. तसंच औषध तयार करण्याच्या फॉर्म्युलामध्ये कोणत्याही पद्धतीची छेडछाड तर केली गेली नाहीय ना याची माहिती मिळणार आहे.

अॅक्टीव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडिएंट्स हे (API) टॅबलेट्स, कॅप्सूल आणि सिरप बनवण्यासाठीचा कच्चा माल असतो. ड्रग्ज टेक्निकल अॅडवायझरी बोर्डानं (DTAB) जून २०१९ मध्ये या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.

क्यूआर कोड म्हणजे क्विक रिस्पॉन्स. एखादी माहिती तात्काळ वाचता यावी यासाठी कोड तयार केला जातो. याला बारकोडचं अपग्रेड व्हर्जनही म्हणता येईल. माध्यमांमधील माहितीनुसार भारत जगातील बनावट औषधांची तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. देशात जवळपास २५ टक्क्यांहून अधिक औषधं बनावट असतात.

एका अहवालानुसार देशात ३ टक्के औषधांची गुणवत्ता खूप कमी दर्जाची असते. API साठी भारतीय कंपन्या बहुतांश प्रमाणात चीनवर अवलंबून आहेत. क्यूआर कोडची नक्कल करणं अशक्य आहे. कारण प्रत्येक क्यूआर कोड त्याच्या बॅच क्रमांकानुसार बदलतो. त्यामुळे देशात औषधांची गुणवत्ता तपसण्यासाठी क्यूआर कोड मोठी क्रांती आणू शकतो.