मंकीपॉक्सवर ICMR ची मोठी योजना; लक्षणे नसलेल्या रुग्णांना ओळखण्यासाठी 'हे' काम करणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 10:47 IST2022-08-19T10:35:36+5:302022-08-19T10:47:05+5:30
Monkeypox : भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सच्या 10 प्रकरणांची पुष्टी झाली आहे.

नवी दिल्ली : भारतात मंकीपॉक्सचा धोका वाढत असताना इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) एक मोठी योजना आखली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ICMR मंकीपॉक्स रुग्णांच्या संपर्कावर सेरोलॉजिकल (रक्त सीरम) सर्वेक्षण करण्याची योजना आखत आहे, जेणेकरून प्रकरणे ओळखता येतील आणि त्यांचे मूल्यांकन करता येईल.
भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सच्या 10 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, ब्रिटिश मेडिकल जर्नल (BMJ) मध्ये प्रकाशित नुकत्याच झालेल्या अभ्यासात आफ्रिकन प्रदेशातील पूर्वीच्या संक्रमित लोकांपेक्षा मंकीपॉक्सची लक्षणे लक्षणीय भिन्न होती.
लंडनमध्ये गेल्या काही महिन्यांत संसर्ग झालेल्या 197 पुरुषांमध्ये आढळून आलेल्या लक्षणांवर आधारित या अभ्यासात असेही आढळून आले की, त्यांच्यापैकी केवळ एक चतुर्थांश पुरुषांना मंकीपॉक्सची पुष्टी झालेल्या एखाद्या व्यक्तीशी संपर्क होता.
या अभ्यासात लक्षणे नसलेल्या किंवा काही लक्षणे नसलेल्या व्यक्तींकडून संक्रमण होण्याची शक्यता वाढते. ब्रिटिश मेडिकल जर्नलने एका निवेदनात म्हटले आहे की, हे निष्कर्ष समजून घेतल्यानंतर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, सार्वजनिक आरोग्य सल्ला आणि संसर्ग नियंत्रण तसेच आयसोलेशन उपायांवर महत्त्वपूर्ण परिणाम होईल.
मंकीपॉक्स संसर्गाच्या लक्षणांमध्ये ताप, अस्वस्थता, घाम येणे, लिम्फ नोड्स सुजणे आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो. संसर्गाच्या 2-4 दिवसांनंतर त्वचा फाटणे देखील एक लक्षण आहे. अभ्यासानुसार, त्वचेतील जखम एकाच वेळी होतात आणि एका नमुन्यात पुढे जातात.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी नुकतेच मंकीपॉक्सबाबत संसदेत सांगितले होते की, त्याचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत.
जनजागृती मोहिमांमधून निदान आणि लसींच्या विकासावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य सरकारांच्या सहकार्याने राष्ट्रीय टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. तसेच, मंकीपॉक्समुळे घाबरण्याची गरज नाही, कारण हा नवीन आजार नाही. तो केवळ क्लोज कॉन्टॅक्टद्वारे पसरतो, असेही सांगण्यात आले आहे.