Health Tips: उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी सकाळी चूळ न भरता पाणी पिण्याची सवय चांगली, डॉक्टर सांगतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 13:51 IST2023-05-22T13:46:10+5:302023-05-22T13:51:59+5:30
Health Tips: उन्हाळ्याच्या काळात शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यासाठी दररोज जवळपास ४ ते ५ लिटर पाणी प्यायला हवं. याचं कारण शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे अनेक शारीरिक व्याधी निर्माण होऊ शकतात. आपल्या घरातील वडीलधारी माणसांकडून किंवा आजी-आजोबाकडून तुम्ही ऐकलं असेल की, सकाळी उठल्यानंतर ब्रश करण्यापूर्वी सर्वप्रथम भरपूर पाणी प्यायला हवं. यामुळे शरीरातील अनेक घातक घटक बाहेर पडण्यास मदत होते आणि आरोग्यही चांगलं राहतं. पण हे कितपत खरं आहे? असा तुम्हाला प्रश्न पडू शकतो. यावर डॉ. अमित भोरकर यांनी केलेले मार्गदर्शन नक्कीच उपयोगी पडेल. ते सांगतात, 'सकाळी दात ब्रश करण्याआधी पाणी पिल्यामुळे कोणत्या प्रकारचे फायदे मिळू शकतात. ते फायदे पुढील प्रमाणे...

पचनसंस्थेचं कार्य राहतं चांगलं
तुम्हाला दररोज सकाळी उठल्यानंतर ब्रश करण्याआधी पाणी प्यायची सवय असेल, तर तुमच्या पचनसंस्थेशी संबंधित समस्या निर्माण होत नाहीत. यामुळे तुमची पचनसंस्था चांगली राहते आणि तोंडात बॅक्टेरियाही जमा राहत नाहीत.
प्रतिकारशक्ती वाढण्यास होते मदत
दररोर सकाळी पाणी प्यायल्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती सूदृढ राहते. तसेच ज्या लोकांना नेहमी सर्दी, ताप यासारख्यी लक्षणे आहेत त्या लोकांनी दररोज सकाळी ब्रश करण्याआधी कोमट पाणी प्यायला हवं.
केस चमकदार राहतात
दररोज सकाळी दात ब्रश करण्याआधी पाणी प्यायल्यामुळे तुमच्या केसांचं आरोग्यही चांगलं राहण्यास मदत मिळते आणि केस चमकदार होतात. पण त्यासाठी तुम्हाला नियमितपिणे सकाळी उठल्यानंतर पाणी प्यावं लागणार आहे.
उच्च रक्कदाबाच्या समस्येपासून दूर राहण्यास मदत
जे उच्च रक्तदाबाचे रूग्ण आहेत त्यांनी दररोज सकाळी पाणी प्यायची सवय लावून घ्यायला हवं. सकाळी उठल्यानंतर साधं पाणी किंवा कोमट पाणी प्यायला हवं. यामुळे रक्तदाबाची पातळी नियंत्रित राहण्यास मदत मिळते.
रक्तातील साखरेची पातळी राहते नियंत्रित
सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायल्यामुळे फक्त उच्च रक्तदाबचे रुग्णच नाही तर मधुमेही रूग्णांनाही फायदा होतो. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी सकाळी उठल्यानंतर दात ब्रश करण्याधी पाणी प्यायची सवय लावून घ्यायला हवी. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत मिळते.
अर्थात कुठल्याही गोष्टीचे अतीप्रमाण सेवन करू नये तसेच आपल्यासाठी योग्य गोष्टी शरीर आपल्याला स्वतः सांगत असते. कुठल्याही गोष्टीचा त्रास होत असेल तो प्रयोग किंवा ती सवय ताबोडतोब थांबवावा...