Coronavirus: कोरोनावरील आणखी एक लस मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात; वैज्ञानिकांना मोठं यश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 09:37 AM2020-07-18T09:37:36+5:302020-07-18T09:41:37+5:30

चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगावर संकट आलं आहे. आतापर्यंत १ कोटी ४१ लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ५ लाख ९८ हजाराहून जास्त मृत्यू झाले आहेत.

जगभरातील वैज्ञानिक कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लसीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यात ब्रिटनमधील दुसरी लस मानवी चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात पोहचली आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठानंतर या दुसऱ्या लशीची चाचणी होत आहे.

लंडन येथील इंपीरियल कॉलेजच्या वैज्ञानिकांनी दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीची सर्व तयारी केली आहे. या लशीचा पहिला टप्पा यशस्वी पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मानवी चाचणी केली जाणार आहे.

मानवी चाचणीच्या या दुसऱ्या टप्प्यात १८ ते ७५ वर्षीय १०५ लोकांना कोरोना लस टोचली जाणार आहे. यानंतर ४ आठवड्यांपर्यंत चाचणीतील लोकांना बूस्टर डोजदेखील देण्यात येईल.

इंपीरियल कॉलेजमधील टीम क्लिनिकल चाचणीशी निगडीत सर्व लोकांच्या आरोग्यावर करडी नजर ठेवणार आहेत.वैक्सीनबाबत आतापर्यंत सर्व चाचण्या सकारात्मक झाल्या आहेत. लशीची चाचणी करण्यासाठी या लोकांच्या रक्ताचे नमुनेही तपासले जाणार आहेत.

जागतिक स्तरावर चिनी कंपनीने सायनोफॉर्मची लशीने मानव चाचणीच्या तिसर्‍या टप्प्यात प्रवेश केला आहे. चाचणीच्या तिसर्‍या फेरीपर्यंत पोहोचणारी ही जगातील पहिली कोविड -१९ लस आहे, असा दावा केला जात आहे.

दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीनंतर नोव्हेंबरमध्ये लशीच्या चाचणीचा तिसरा टप्पा पार पडेल. यावेळी ६ हजार लोकांवर एकत्ररित्या चाचणी करण्यात येईल. इंपीरियल कॉलेजच्या टीमने २०२१ पर्यंत लशीचं उत्पादन करण्याची शक्यता असल्याचं सांगितलं आहे.

जगातील इतर लशींपैकी बहुतेक चाचण्या या विषाणूचे कमकुवत किंवा परिवर्तित स्वरूप आहेत. या इंपीरियल कॉलेजची लस अनुवांशिक कोडचा कृत्रिम स्ट्रँड वापरुन व्हायरसवरील परिणाम दूर करेल. ही लस स्नायूमध्ये इजेक्ट झाल्यानंतर स्पाइक प्रोटीन तयार करण्यास मदत करेल.

सध्या जगभरात कोरोना लशीवर १२० हून अधिक वैज्ञानिक टीम कार्यरत आहेत. यात १३ लशीच्या क्लिनिकल चाचणीच्या टप्प्यात पोहचले आहेत. यात सर्वात जास्त लशीची मानवी चाचणी चीनमध्ये होत आहे.

चीनमध्ये ५, ब्रिटन २, अमेरिका ३, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी प्रत्येकी १-१ लस क्लिनिकल चाचणीपर्यंत पोहचली आहे.