coronavirus: ऑक्सफर्डची कोरोना लस सुरक्षित की असुरक्षित?, समोर आली मोठी माहिती…

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 08:54 AM2020-09-18T08:54:32+5:302020-09-18T09:06:12+5:30

ऑक्सफर्डकडून विकसित करण्यात येत असलेल्या लसीचे काही दुष्परिणाम होतात का आणि ज्या स्वयंसेवकामध्ये काही दुष्परिणाम दिसून आले होते. त्याचा लसीशी काही संबंध आहे का याचीही माहिती समोर आली आहे.

कोरोना विषाणूच्या फैलावाचा कहर संपूर्ण जगात सुरू आहे. जगातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आता तीन कोटींचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीसाठी सध्या जगात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे.

दरम्यान, जगात कोरोनावरील अनेक लसींचा चाचणी सुरू असली तरी सर्वाधिक अपेक्षा ह्या ऑक्सफर्डकडूवन विकसित होत असलेल्या कोरोनाच्या लसीकडून आहेत. मात्र ही लस घेणाऱ्या एका स्वयंसेवकारवर दुष्परिणाम दिसून आल्याने या लसीची चाचणी थांबवण्यात आली होती. मात्र आता ऑक्सफर्डच्या या लसीची चाचणी पुन्हा सुरू करण्यात आल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे.

तसेच ऑक्सफर्डकडून विकसित करण्यात येत असलेल्या लसीचे काही दुष्परिणाम होतात का आणि ज्या स्वयंसेवकामध्ये काही दुष्परिणाम दिसून आले होते. त्याचा लसीशी काही संबंध आहे का याचीही माहिती समोर आली आहे.

ऑक्सफर्डकडून सर्व स्वयंसेवकांना काही कागदपत्रे पाठवण्यात आली आहेत. त्यामध्ये संबंधित स्वयंसेवकाला झालेला त्रास हा चाचणी घेण्यात आलेल्या एस्ट्राजेनेका लसीमुळे झालेला नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी करण्यात आलेल्या एक स्वयंसेवकामध्ये काही दिवसांपूर्वी काही गंभीर दुष्परिणाम दिसून आले होते.

ऑक्सफर्डने या माहितीमध्ये म्हटले आहे की, चाचणीच्या स्वतंत्रपणे करण्यात आलेल्या अभ्यासामध्ये संबंधित स्वयंसेवकाला झालेला त्रास हा कुठल्याही प्रकारे कोरोना लसीशी संबंधित नसल्याचे समोर आले आहे. तसेच या लसीमुळे संबंधित स्वयंसेवकाची प्रकृती बिघडल्याचे पुरेसे पुरावे मिळालेले नाहीत. ही माहिती मिळाल्यानंतर समीक्षकांनी चाचणी सुरू ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

या लसीची चाचणी थांबवण्यात आल्यानंतर अॅस्ट्राजेनेका आणि ऑक्सफर्डला प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरे जावे लागले होते. अमेरिकेत ऑस्कफर्ड विद्यापीठाच्या लसीवरील संशोधनाला रेग्युलेटरी रिव्ह्यू मिळेपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. तर चाचणी आलेल्या अडथळ्यामुळे लसीच्या सुरक्षितेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, ऑक्सफर्डच्या लसीवरील संशोधन स्थगित झाल्याने कोरोनापासून संरक्षण करणारी पहिली लस कधीपर्यंत तयार होईल, याची चिंता वाढली आहे.

सध्या कोरोना विषाणूविरोधात विकसित करण्यात येत असलेल्या लसीमध्ये ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राजेनेकाची लस सर्वात आघाडीवर आहे. तसेच लवकरात लवकर लस विकसित करण्यासाठी ही कंपनी प्रयत्नशील आहे.

दरम्यान, अॅस्ट्राजेनेकाच्या कोरोनाविरोधातील लसीचे शेवटच्या टप्प्यातील चाचणीचे परिणाम पुढील महिन्यापर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच या वर्षाच्या अखेरीपर्यंत ऑक्सफर्डची लस तयार होईल, असा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे.

आता ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत पुन्हा सुरू झाली आहे. तसेच भारतामध्ये देखील चाचणी पुन्हा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे.

Read in English