CoronaVirus Live Updates : कोरोनाचा तरुणांच्या फुफ्फुसावर नेमका कसा होतोय परिणाम?; रिसर्चमधून मोठा खुलासा, तज्ज्ञ म्हणतात....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 03:51 PM2021-09-14T15:51:44+5:302021-09-14T16:03:52+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक वाईट परिणाम फुफ्फुसांवर होत असल्याचं याआधी समोर आलं आहे. मात्र आता करण्यात आलेल्या एका नव्या संशोधनात एक मोठा दावा करण्यात आला आहे.

जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 22 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या 226,177,513 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत जगभरात कोरोनाने जवळपास 4,654,317 लोकांचा बळी घेतला आहे. उपचारानंतर अनेकांनी कोरोनावर मात केली असून 202,835,279 जण बरे झाले आहेत.

कोरोनामुळे अनेक प्रगत देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येने चिंतेत भर पडली आहे. भारतातही कोरोनाने थैमान घातले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 3,32,89,579 वर पोहोचला आहे.

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 25,404 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 339 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,43,213 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनासंदर्भात अनेक रिसर्च करण्यात येत असून नवनवीन माहिती सातत्याने समोर येत आहे.

कोरोनाचा तरुणांच्या फुफ्फुसावर नेमका कसा परिणाम होतोय याबाबत रिसर्चमधून मोठा खुलासा करण्यात आला आहे. कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक वाईट परिणाम फुफ्फुसांवर होत असल्याचं याआधी समोर आलं आहे. मात्र आता करण्यात आलेल्या एका नव्या संशोधनात एक मोठा दावा करण्यात आला आहे.

कोरोना संसर्गामुळे तरुण व्यक्तींमध्ये फुफ्फुसांचे नुकसान होण्याचा धोका खूपच कमी असल्याचं म्हटलं आहे. कोरोनामुळे तरुणांच्या फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत नाही. फुफ्फुसे पूर्वीप्रमाणे काम करतात, असा दावा नुकत्याच करण्यात आलेल्या रिसर्चमधून करण्यात आला आहे.

व्हर्च्युअल युरोपियन रेस्पिरेटरी सोसायटी इंटरनॅशनल काँग्रेसमध्ये (virtual European Respiratory Society International Congress) सादर करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये हे म्हटलं आहे. स्वीडनमधील कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटचे (Karolinska Institute) संशोधक डॉ. इडा मोगेंसेन (Dr. Ida Mogensen) यांनी या संशोधनाबाबत माहिती दिली आहे.

मोगेंसेन यांनी कोरोनाग्रस्त असलेल्या तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांच्या फुफ्फुसाच्या कार्यावर कोणताही परिणाम झाला नाही. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असला तरी फुफ्फुसांच्या काम करण्याच्या क्षमतेवर त्याचा कोणताही परिणाम झाला नसल्याचं रिसर्चमध्ये स्पष्ट झालं असल्याचं म्हटलं आहे.

लहान मुलं (Children) आणि किशोरवयीन मुलांमध्ये कोरोनामुळे फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचं आढळून आलं आहे, असा दावा आणखी एका रिसर्चमध्ये करण्यात आला आहे. कोरोनापूर्वी त्यांची फुफ्फुसे ज्या क्षमतेनं काम करत होती, त्याच क्षमतेनं ते कोरोनानंतरही काम करत असल्याचं आढळलं आहे.

गंभीर स्थिती असलेल्या मुलांच्या फुफ्फुसांवर मात्र परिणाम झाला असल्याचा निष्कर्ष या रिसर्चमध्ये नमूद करण्यात आला आहे. स्टॉकहोममध्ये (Stockhome) करण्यात आलेल्या या रिसर्चमध्ये 1994 ते 1996 दरम्यान जन्म झालेल्या म्हणजे साधारण 22 वर्षे वयाच्या तरुणांचा समावेश होता.

कोरोनापूर्वी म्हणजे 2016 ते 2019 दरम्यान, या लोकांच्या अन्य कारणांमुळे विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. ऑक्टोबर 2020 ते मे 2021 दरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यावेळी त्यांच्या फुफ्फुसाच्या चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये रोगप्रतिकारक शक्तीचा एक महत्त्वाचा घटक असलेल्या इओसिनोफिल्सची (eosinophils) चाचणी करण्यात आली.

661 लोकांपैकी 178 लोकांमध्ये कोरोनाच्या व्हायरसविरुद्ध (SARS-CoV-2) अँटीबॉडीज (Antibodies) तयार झाल्या असल्याचं आढळून आलं. कोरोनापूर्वी आणि कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर या लोकांच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता पूर्वीसारखीच असल्याचंही यावेळी स्पष्ट झालं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनातून बरं झाल्यावर किडनीवर परिणाम होत असल्याची माहिती मिळत आहे. कोणतीही लक्षणं न दिसता किडनी 70 टक्के काम करणं बंद करत असल्याची माहिती आता समोर आली आहे. जर्नल ऑफ दी अमेरिकन सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी (Journal of the American Society of Nephrology) या जर्नलमध्ये या नव्या संशोधनाबद्दलचा रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे.

कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात जावं लागलेल्या किंवा कोरोना संसर्गाची सौम्य लक्षणं दिसलेल्या रुग्णांनाही किडनीशी संबंधित समस्या जाणवत असल्याचं दिसून आल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. कोरोना संसर्ग होऊन त्यातून बऱ्या झालेल्या रुग्णांना या समस्या जाणवत असल्याचं म्हटलं आहे.

समस्यांवर लवकर उपचार केले गेले नाहीत, तर किडनीचा गंभीर विकार होऊ शकतो, असा इशाराही रिपोर्टमध्ये देण्यात आला आहे. किडनी निकामी झाली, तर शरीरातल्या अन्य अवयवांवरही विपरीत परिणाम होतो, असं अनेक विशेषज्ञांनी म्हटलं आहे.

आपली किडनी योग्य पद्धतीने काम करत नाहीये किंवा तिची कार्यक्षमता कमी झाली आहे, हे जवळपास 90 टक्के जणांना माहितीच नसतं, असं संशोधकांनी केलेल्या माहितीच्या विश्लेषणानंतर लक्षात आलं. कारण त्याबद्दलची लक्षणं दिसून येत नाहीत. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या (Washington University) रिसर्चमधून असं दिसून आलं आहे, की किडनी निकामी होण्याची समस्या अशा रुग्णांमध्ये वाढत चालल्याचं दिसून येत आहे.