coronavirus: …म्हणून भारतात वेगाने वाढताहेत कोरोनाचे रुग्ण, समोर आलं मोठं कारण

By बाळकृष्ण परब | Published: September 21, 2020 02:17 PM2020-09-21T14:17:46+5:302020-09-21T14:56:51+5:30

Coronavirus Cases in India: भारतात कोरोवनाच्या संसर्गाच्या वाढलेल्या वेगामागचे महत्त्वाचे कारण समोर आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशभरात आता दिवसाला सरासरी ९० हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत.

दरम्यान, भारतात कोरोवनाच्या संसर्गाच्या वाढलेल्या वेगामागचे महत्त्वाचे कारण समोर आले आहे. देशातील कोरोनाच्या वाढत्या वेगामागे कोरोना विषाणूचे सर्वात संसर्गजन्य प्रतिरूप A2a आहे. कोरोनाच्या या प्रतिरूपाने अवघ्या काही दिवसांतच देशातील ७० टक्के रुग्णांना आपल्या विळख्यात घेतले आहे.

आता A3i हे कोरोनाचे प्रतिरूप भारतातून हळूहळू नष्ट झाल्याच आश्चर्य वाटायला नको, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. मात्र आता A3i या प्रतिरूपाचे स्थान A2a या प्रतिरूपाने घेतले आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे कोरोनाचे हे प्रतिरूप अधिक वेगाने फैलावते. आता कोरोनाचे A2a हे रूप देशात मोठ्या प्रमाणात पसरले आहे.

सीसीएमबीचे संचालक डॉ. राकेश कुमार यांच्या म्हणण्यानुसार वाटत असलेल्या भीतीप्रमाणे कोरोनाच्या A2a या रूपाने इतर जगाप्रमाणे भारतातही आपले हातपाय पसरले आहेत. मात्र संपूर्ण जगात पसरलेल्या विषाणूमधील एकाच प्रकारच्या जीनोममुळे एकाच प्राकरची लस आणि औषध या म्युटेशनविरोधात परिणामकारक ठरेल.

मात्रा कोरोनाचे A2a हे प्रतिरूप A3i या प्रतिरूपापेक्षा अधिक धोकादायक आहे किंवा नाही याबाबत अभ्सासातून स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र A2a या प्रतिरूपाच्या संसर्गाचा वेग हा खूप अधिक असल्याचे समोर आले आहे. आता जोपर्यंत प्रभावी लस विकसित होत नाही तोपर्यंत कोरोनाच्या A2a या प्रतिरूपापासून वाचणे हाच एकमेव उपाय असेल.