CoronaVaccine : पंतप्रधान मोदी करणार लसीकरण अभियानाला सुरुवात, 'या' राज्यांत मिळणार मोफत कोरोना लस

By श्रीकृष्ण अंकुश | Published: January 14, 2021 03:55 PM2021-01-14T15:55:25+5:302021-01-14T16:11:42+5:30

संपूर्ण देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण अभियानाला सुरुवात होत आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी या अभियानाची सुरुवात करणार आहेत. गेल्या वर्षभरापासून देशातील सर्वच नागरिक या दिवसाची वाट पाहत होते. मात्र, आता त्यांची ही प्रतीक्षा संपणार आहे.

सांगण्यात येते, की लसिकरण अभियानाच्या पहिल्याच दिवशी जवळपास तीन लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस टोचण्यात येणार आहे. यातच सर्वांच्याच मनात एक प्रश्न निश्चितपणे येत असेल, की आगामी काळात त्यांना मोफत कोरोना लस मिळणार की नाही? तर जाणून घ्या, दिल्ली आणि पश्चिम बंगालसह देशातील कोणकोणत्या राज्यांनी आपल्या नागरिकांना मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली आहे.

पश्चिम बंगाल - राज्यात विधानसभा निवडणुकीचे नगारे वाजत आहेत. यातच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 10 जानेवारीला, सरकार राज्यातील प्रत्येक व्यक्तीला मोफत कोरोना लस देण्याची व्यवस्था करत आहे, असे म्हटले होते.

ममता म्हणाल्या होत्या, की "मला ही घोषणा करताना आनंद होत आहे, की आमचे सरकार राज्यातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस देण्याची व्यवस्था करत आहे.''

दिल्ली - राज्यात केजरीवाल सरकारनेही मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी, केंद्राने मोफत लस दिली नाही, तर आम्ही देऊ, असे म्हटले आहे.

बुधवारी दिल्लीला कोव्हॅक्सीन लसीचे 20,000 डोस मिळाले आहेत. येथील राजीव गांधी रुग्णालयात तीन टप्प्यांची सुरक्षा व्यवस्था आहे. तसेच 15 नवे सीसीटीव्ही कॅमेरेदेखील येथे लावण्यात आले आहेत.

पंजाब - लोहडीनिमित्त बुधवारी राज्याचे आरोग्यमंत्री बलबीर सिद्धू यांनीही पंजाबमध्ये सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस दिली जाईल, असे म्हटले आहे. राज्यात लसीचे दोन लाख 40 हजार डोस आले असल्याचेही त्यांनी सांगितले. (फोटो : एएनआई)

बिहार - राज्यात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच, भाजपने आपल्या वचननाम्यात सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुकीनंतर भाजपने जेडीयूसोबत राज्यात सरकार स्थापन केले आहे. भाजपने निवडणुकीपूर्वी मोफत कोरोना लस देण्याचे वचन दिल्यानंतर मोठा गोधळ निर्माण झाला होता.

तामिळनाडू - मुख्यमंत्री ई पलानीस्वामी यांनीही राज्यातील जनतेला मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली आहे. पलानीस्वामी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात म्हणाले होते, की 'एकदा कोरोना लस तयार झाली, की राज्यातील प्रत्येक नागरिकाला ती मोफत दिली जाईल.' महत्वाचे म्हणजे यावर्षी तामिळनाडूमध्ये विधनसभा निवडणुका होत आहेत.

मध्य प्रदेश - मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात राज्यातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली होते. मात्र, यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर यू-टर्न घेतला होता आणि म्हणाले होते, की ''जेव्हापासून देशात लसीचे ट्रायल सुरू झाले, तेव्हापासून देशातील गरीब वर्गात एक चर्चा सुरू आहे, ती म्हणजे, आपल्याला लसीचा खर्च परवडे का?” आज मी स्पष्ट करतो, की मध्यप्रदेशात प्रत्येक गरीब व्यक्तीला मोफत लस मिळेल. ही लढाई आपण जिंकू.'' अर्थात राज्यातील गरीब लोकांनाच केवळ मोफत लस दिली जाईल.

केरळ - तमिळनाडू शिवाय केरलचे मुख्यमंत्री पी विजयन यांनीही राज्यातील नागरिकांना मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली आहे. मात्र, त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान हे आश्वासन दिले होते. यावर, त्यांच्या या घोषणेनंतर राज्यातील विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाचे दार ठोठावले होते. यानंतर निवडणूक आयोगानेही मुख्यमंत्री विजयन यांना उत्तर मागितले होते. त्यामुळे येथील लोकांना लस दिली जाईल की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही.

देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण अभियानाला सुरुवात होत आहे.