ऑफिसमधल्या मशिनची कॉफी गुपचूप वाढवतेय कोलेस्ट्रॉल; योग्य पर्याय कोणता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 15:29 IST2025-03-29T15:21:41+5:302025-03-29T15:29:19+5:30

Coffee Machine: बऱ्याचदा ऑफिसमधली कॉफी मशीन ही अनेकांसाठी महत्त्वाची असते. कारण कॉफी कामाच्या दरम्यान बराच काळ ताजेतवाने राहण्यास मदत करते. ऑफिसमधील हे मशीन तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

ऑफिसमध्ये काम करताना मूड फ्रेश राहण्यासाठी आणि एनर्जी टिकवण्यासाठी कॉफी पिणे अगदी सामान्य आहे. लोक ऑफिसमध्ये असलेल्या कॉफी व्हेंडिंग मशीनमधून कॉफी पितात. दिवसातून अनेक वेळा ऑफिस मशिनमधून कॉफी प्यायली जाते. पण हीच मशिनमधील कॉफी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.

दूध आणि साखरेशिवाय कॉफीचे अनेक फायदे आहेत, पण ऑफिसमधील कॉफी मशीन तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. स्वीडनमधील नवीन संशोधनातून हे समोर आलं आहे.

तुमच्या कामाच्या ठिकाणी कॅफीनचे सेवन कालांतराने हाय कोलेस्टेरॉल लेव्हलशी जोडले जाऊ शकते. मशिन कॉफीमुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित समस्या वाढू शकतात.

अप्सला युनिव्हर्सिटी आणि चाल्मर्स युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधनात असे आढळून आले की ऑफिस मशिनमध्ये बनवलेल्या कॉफीमध्ये पेपरमधून फिल्टर केलेल्या कॉफीपेक्षा जास्त कोलेस्टेरॉल वाढवणारी संयुगे असतात.

स्वीडिश हेल्थकेअरमध्ये केलेल्या संशोधनात, कॅफेस्टोल आणि काहवेलचे प्रमाण तपासण्यासाठी १४ वेगवेगळ्या ऑफिसमधील मशीनमधील कॉफीची तपासणी केली गेली.

ही संयुगे कॉफी तेलांमध्ये आढळतात, जी कोलेस्टेरॉलची पातळी वाढवण्यासाठी ओळखली जातात. सामान्यतः, पेपर फिल्टरमध्ये हे अडवले जातात. मात्र कामाच्या ठिकाणी ब्रुअर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या मेटल फिल्टर्समुळे हे पदार्थ कॉफी कपमध्ये जातात.

संशोधकांना मशीनमधल्या कॉफीमध्ये १७६ मिलीग्राम प्रति लीटर कॅफेस्टॉल सापडले जे पेपर-फिल्टर कॉफीमध्ये असलेल्या १२ मिलीग्राम प्रति लिटरपेक्षा १५ पट जास्त आहे. त्यामुळे जो कर्मचारी दिवसातून तीन किंवा अधिक कप कॉफी पितो तो नकळत त्याच्या कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ करत असतो.