जाणून घ्या, लेमन टी पिण्याचे फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 10:33 PM2019-09-17T22:33:13+5:302019-09-17T22:39:15+5:30

अनेकजण आरोग्य निरोगी राखण्यासाठी लेमन टी पितात. लेमन टीमुळे तुमची पचनसंस्था निरोगी राहून तुमच्या शरीरात उर्जा निर्माण होते व तुम्ही दिवसभर तजेलदार दिसता. याशिवाय, लेमन टी प्यायल्याने आणखी कोणकोणते फायदे होतात, हे आपण पाहूया.

पचनसंस्थेचं शुद्धीकरण : लेमन टी प्यायल्याने पचनसंस्थेचं शुद्धीकरण होतं. लेमन टी मुळे शरीरातील टॅाक्सिन्स शरीराबाहेर पडतात. त्यामुळे पोटाचे कोणतेही विकार होत नाहीत. त्यामुळे पोटदुखी अथवा आतड्यांचे विकार असणाऱ्यांसाठी लेमन टी उपयुक्त असते.

सर्दी आणि तापासाठी उपयुक्त - लेमन टीमध्ये आलं टाकून दिवसातून ३-४ वेळा प्यायल्याने सर्दी बरी होते. तसंच घशाची खवखव किंवा खोकला बरा करण्यासाठीही लेमन टीचा उपयोग होतो. लेमन टीमध्ये मध घालून प्यायल्याने श्वसनाचे आजार होत नाहीत.

मानसिक स्थैर्यासाठी : लेमन टीमुळे पोट साफ राहतं. जीवनशैलीतील ताणतणावामुळे आपल्या शरीरात टॅाक्सिन्स वाढतात. त्यामुळे दिवसातून किमान एकदा तरी लेमन टी प्यायल्याने ताणतणावामुळे होणारी डोकेदुखी, थकवा, सुस्ती नाहीशी होते.

शरीरातील साखरेवर नियंत्रण : शरीरात इन्सुलिन्सचं प्रमाण वाढल्याने ब्लड प्रेशरचा त्रास वाढतो. त्यामुळे दिवसातून ३-४ वेळा लेमन टी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते व कोलेस्टरॉल कमी होते.

वजन कमी करण्यासाठी : व्यायामासोबत योग्य आहार ठेवला तरच वजन नियंत्रणात राहतं. त्यामुळे सकाळी उठल्यावर व्यायाम करण्याआधी लेमन टी प्यायल्याने वजन कमी राहण्यास मदत होते. तसंच भुकेचंही प्रमाण नियंत्रित राहतं.

चेहरा टवटवीत दिसण्यासाठी : लेमन टीमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे चेहऱ्यावर येणारी मुरूमे आणि काळे डाग कमी व्हायला मदत होते. लेमन टीमध्ये मध आणि साखर मिश्रित करून दररोज प्यायल्याने चेहरा तजेलदार दिसतो.