'या' सिनेनट्यांच्या वाट्याला कमी वयात आले वैधव्याचे दुःख आणि जोडीला एकल पालकत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 17:55 IST2022-11-29T17:51:59+5:302022-11-29T17:55:24+5:30

सिनेक्षेत्र, ज्याला आपण चंदेरी दुनिया असेही म्हणतो. या तारांगणातले अनेक तारे आपल्याला खुणावतात. आपल्याला त्यांचे लुकलुकणे दिसते, परंतु त्यांच्या आयुष्यात असलेला काळाकुट्ट अंधार दिसतोच असे नाही. आज आम्ही या लेखाच्या माध्यमातून अशाच एका कटू सत्यावर प्रकाश टाकत आहोत, तो म्हणजे कमी वयात वैधव्य आलेल्या सिने नट्यांच्या आयुष्यावर!

रेखा आणि अमिताभ यांचे किस्से आजही लोक आवडीने चघळतात, मात्र कित्येक जणांना हे माहीत नाही, की रेखाचे लग्न झाले होते आणि वैवाहिक आयुष्यात अनंत अडचणींना सामोरेही जावे लागले होते. १९९० मध्ये रेखाने दिल्लीस्थित व्यापारी मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले. मात्र काही काळानंतर रेखाच्या लग्नात अडचणी निर्माण झाल्या. व्यवसाय आणि लग्नातील अपयशामुळे मुकेश उदास झाला आणि त्याने आणि रेखाने परस्पर घटस्फोटासाठी सहमती दर्शवली. ऑक्टोबर १९९० मध्ये मुकेशने रेखाच्या ओढणीने आत्महत्या केली. त्यांच्या लग्नाला फक्त ६ महिने झाले होते आणि त्यावेळी रेखा अवघी ३६ वर्षांची होती. त्यानंतर तिने विनोद मेहरा यांच्याशी विवाह केल्याच्या अफवाही पसरल्या, मात्र विनोद मेहरा यांचेही हृदय विकाराने निधन झाले आणि त्या अफवांना पूर्णविराम मिळाला.

मंदिरा बेदी ही ग्लॅमर जगतातील सर्वात लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक आहे. १९९४ च्या टेलिव्हिजन शो, शांती मधील तिच्या मुख्य भूमिकेने ती प्रसिद्ध झाली. मंदिराने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले. १९९९ मध्ये चित्रपट निर्माता राज कौशलशी तिने लग्न केले. १२ वर्षांनंतर, या जोडप्याने त्यांच्या पहिल्या मुलाला वीर कौशलला जन्म दिला. तसेच २०२० मध्ये, म्हणजे आपल्या मुलाच्या जन्मानंतर नऊ वर्षांनी, त्यांनी तारा नामक मुलीला दत्तक घेतले आणि आपले नाव दिले. मात्र दुर्दैवाने पुढच्याच वर्षी २०२१ मध्ये तिचे पती राज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

सौगंध चित्रपटात अक्षय कुमारसोबत काम केलेली अभिनेत्री शांतीप्रियाने १९९९ मध्ये अभिनेता सिद्धार्थ रेसोबत लग्न केले. या जोडप्याने दोन मुलांना जन्म दिला. मात्र, २००४ मध्ये सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यावेळी शांतीप्रिया ३५ वर्षांची होती. लहान वयात वैधव्य तर आलेच शिवाय एकल पालकत्व स्वीकारावे लागले.

लीना चंदावरकर आणि किशोर कुमार यांच्या वयात २० वर्षांचा फरक होता, तरीही ती किशोर कुमारची चौथी पत्नी बनली. या जोडप्याने मुलाला जन्म दिला. त्याचे नाव सुमीत गांगुली. दुर्दैवाने, लग्नाच्या साडेसात वर्षांनंतर, किशोर कुमार यांचे १९८७ मध्ये निधन झाले आणि वयाच्या ३७ व्या वर्षी लीना विधवा झाली. ती सध्या तिचा मुलगा सुमीत, सावत्र मुलगा अमित कुमार आणि त्याच्या पत्नीसोबत राहत आहे.

कहकशा पटेल हिचा एकेकाळी टॉप अभिनेत्रींच्या यादीत समावेश होता. त्यांनी अनेक पंजाबी म्युझिक अल्बम केले. कहकशाचा विवाह आरिफ पटेल नावाच्या व्यावसायिकाशी झाला होता. या जोडप्याला अरहान आणि नुमैरे ही दोन मुले आहेत. दुर्दैवाने, २०१८ मध्ये, काहक्शानचा पती आरिफला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला.

विजया पंडित ८० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. १९८१ मध्ये लव्ह स्टोरी या चित्रपटातून सुंदर कुमार गौरवसोबत सिनेसृष्टीत पदार्पण करून तिने सर्वांची मने जिंकली. १९८६ मध्ये विजयाने कार चोर चित्रपटात काम केले आणि दिग्दर्शक समीर मलकन यांच्याशी लग्न केले. मात्र, हे नाते टिकले नाही आणि दोघांनी घटस्फोट घेतला. समीर मलकानपासून विभक्त झाल्यानंतर, विजेता पंडित यांनी १९९० मध्ये संगीतकार आदेश श्रीवास्तव यांच्याशी लग्न केले आणि अनिवेश व अवितेश या दोन मुलांना जन्म दिला. २०१० मध्ये, आदेश यांना गंभीर आजाराचे निदान झाले आणि २०१५ मध्ये त्यांचे निधन झाले. पतीच्या निधनाच्या वेळी विजयता या अवघ्या ४८ वर्षांच्या होत्या. आदेश श्रीवास्तव यांच्या निधनानंतर विजेता यांना अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले.