"आम्ही घरात मराठी नाही तर हिंदी बोलतो...", मराठमोळ्या अभिनेत्रीचा खुलासा; नक्की कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 16:39 IST2025-07-07T16:31:52+5:302025-07-07T16:39:04+5:30

मराठी-हिंदी मुद्दा चर्चेत असतानाच मराठी अभिनेत्रीचं वक्तव्य व्हायरल होत आहे. कोण आहे ही अभिनेत्री?

महाराष्ट्रात हिंदी सक्तीचा मुद्दा चर्चेत होता. पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा सरकारने निर्णय घेतला. यावरुन मराठी भाषेसाठी सर्व एकवटले आणि त्यांनी सरकारचा विरोध केला. अखेर सरकारने जीआर रद्द केला. मराठी कलाकारांनीही याविरोधात आवाज उठवला होता.

दरम्यान एक मराठी अभिनेत्री ट्रोल होत आहे. पंजाबी व्यक्तीशी लग्न केल्यानंतर घरात आम्ही फक्त हिंदीच बोलतो असं ती सांगताना दिसतेय. हिंदी-मराठीच्या चर्चांमध्ये आता तिला पुन्हा ट्रोल केलं जात आहे.

अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत झळकलेली ही अभिनेत्री आहे किशोरी शहाणे विज(Kishori Shahane Vij). घरात हिंदी बोलण्याबद्दल त्या नक्की काय म्हणाल्या?

किशोरी शहाणेंनी १९९१ साली दीपक विज यांच्याशी लग्नगाठ बांधली. मराठमोळ्या किशोरी शहाणे लग्नानंतर पंजाबी कुटुंबात गेल्या.

काही दिवसांपूर्वी 'लोकशाही'ला दिलेल्या मुलाखतीत किशोरी शहाणे विज म्हणाल्या,"कुटुंब माझ्यासाठी कायम प्राधान्य राहिलं आहे. विशीत मी दीपक विज यांच्या प्रेमात पडले होते. आम्ही काही वर्ष डेट केलं. मी महाराष्ट्रीय आणि दीपकजी पंजाबी असल्याने आमचं लग्न होईल का असं मला वाटत होतं? मी तसं त्यांना थेट विचारलं होतं."

"माझ्या सासू सासऱ्यांनी त्यांच्या काळात लव्ह मॅरेज केलं होतं. माझी सासू बंगाली आहे आणि सासरे पंजाबी."

"घरात मात्र पंजाबी आणि बंगाली दोन्ही बोलल्या जात नाहीत. हिंदी हीच भाषा कायमस्वरुपी बोलली जाते. जेव्हा पंजाबहून नातेवाईक येतात तेव्हा पंजाबी कानावर पडते. मी तेव्हाही हिंदीच बोलते. मला पंजाबी समजते पण बोलता येत नाही."

"माझा मुलगा बॉबीवर मी मराठी संस्कारच केले आहेत. दीपकही पंजाबी असले तरी त्यांची कर्मभूमि महाराष्ट्र असल्याने तेही स्वत:ला महाराष्ट्रीयच म्हणतात. सर्वात आधी महाराष्ट्रीय, मग भारतीय आणि मग शेवटी पंजाबी किंवा बंगाली आहे."