आर्यनची चूक शाहरुखला कितीला पडणार? समोर आला मोठ्ठा आकडा; ब्रँड व्हॅल्यूला जबरदस्त झटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 13:52 IST2021-10-12T13:45:40+5:302021-10-12T13:52:11+5:30
Aryan Drugs Case: शाहरुख खानच्या ब्रँड व्हॅल्यूला मोठा फटका; सणासुदीआधी शाहरुखला धक्का

आर्यन खानला अटक होऊन आठवडा उलटला आहे. क्रूझ शिपमध्ये ड्रग पार्टीत आर्यन खानला अटक झाली. एनसीबीनं समुद्रात केलेल्या कारवाईचा खूप मोठा फटका शाहरुख खानला बसताना दिसत आहे.
शाहरुखचा झिरो चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. त्यानंतर जवळपास तीन वर्षांनंतर शाहरुख सेटवर परतला. शाहरुख अनेक मोठ्या ब्रँडच्या जाहिरातींमध्ये दिसतो. त्याची ब्रँड व्हॅल्यू खूप मोठी आहे. मात्र आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकल्याचा मोठा फटका शाहरुखनच्या ब्रँड व्हॅल्यूला बसताना दिसत आहे.
शाहरुखच्या पठाण सिनेमाचं चित्रीकरण थांबवण्यात आलं आहे. त्यात शाहरुख दीपिकासोबत दिसणार आहे. याशिवाय दक्षिणेतील दिग्दर्शक अतलीच्या चित्रपटाचं चित्रीकरणदेखील थांबवण्यात आलं आहे. या चित्रपटांचं चित्रीकरण नेमकं कधी सुरू होणार याबद्दल कोणतीही माहिती नाही.
आर्यन खानला अटक झाल्यानंतर चित्रपटसृष्टीतून शाहरुखला पाठिंबा मिळाला. अनेकांनी आर्यनची बाजू लावून धरली. मात्र ट्विटरवर शाहरुखवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरतेय. #Boycott_SRK_Related_Brands ट्रेंडमध्ये आहे.
शाहरुखकडे अनेक मोठे ब्रँड आहेत. मात्र आर्यनच्या अटकेनंतर बहुतांश ब्रँड्सनी शाहरुखसोबतचे करार अनिश्चित कालावधीसाठी स्थगित केले आहेत. त्यामुळे सणासुदीच्या तोंडावर शाहरुखला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
सोशल मीडियावर होणाऱ्या विरोधानंतर बायजूसनं शाहरुखचा सहभाग असलेल्या सर्व जाहिराती थांबवल्या. शाहरुख २०१७ पासून बायजूसचा ब्रँड ऍम्बेसेडर आहे. आर्यनच्या अटकेनंतर बायजूसच्या जाहिराती ट्रोल होऊ लागल्या. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
शाहरुखनं काही दिवसांपासून विमल इलायचीच्या जाहिरातीत दिसू लागला. त्यात तो अजय देवगनसोबत झळकला. विमल इलायचीसोबत शाहरुख D’Decor, Big Basket, LG च्या जाहिरातीत दिसतो.
सणासुदीचे दिवस जवळ आहेत. या कालावधीत शाहरुख मोठ्या जाहिरातींमध्ये झळकणार होता. त्यासाठीची तयारीदेखील पूर्ण झाली होती. मात्र आर्यनच्या अटकेनं शाहरुखच्या ब्रँड व्हॅल्यूला धक्का बसला आहे.
शाहरुखची ब्रँड व्हॅल्यू ३७८ कोटी रुपये आहे. किंग खान सध्या ४० ब्रँड्सचं प्रमोशन करतो. प्रत्येक ब्रँडकडून शाहरुखला ४ कोटी रुपये मिळतात. त्यावरून शाहरुखला होणाऱ्या नुकसानाचा अंदाज लावता येऊ शकेल.