School Reopening: जुनं ते सोनं! शाळा उघडण्यासाठी ICMR अनोखा सल्ला; लवकरच शाळेची घंटा वाजणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 12:46 PM2021-09-28T12:46:04+5:302021-09-28T12:51:01+5:30

School Reopening: कोरोनामुळं गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. परंतु त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासावर त्याचा परिणाम होत आहे.

कोरोना महामारीनंतर जगातील ७ पैकी १ मुलाचं ७५ टक्के शिक्षण कुठल्याही शिक्षकाविना झालं आहे. ज्यामुळे मुलांच्या सामाजिक, शारिरीक आणि मानसिक विकासावर खूप वाईट परिणाम झाला आहे. यूनेस्कोच्या एका रिपोर्टनुसार भारतात कोरोना काळात ५०० दिवसांपेक्षा जास्त काळ शाळा बंद असल्याने ३२ कोटी मुलांवर त्याचा परिणाम झाला आहे.

ऑगस्ट २०२१ मध्ये करण्यात आलेला सर्व्हे Indian Journal of Medical Research मध्ये छापण्यात आला आहे. आता आयसीएमआरने जुन्या पद्धतीनुसार खुल्या मैदानात अथवा झाडाखाली शिक्षण देत शाळा उघडण्याचा सल्ला दिला आहे.

भारतातील १५ राज्यात १३६२ घरांत केलेल्या सर्व्हेप्रमाणे गावात राहणारे ८ टक्के आणि शहरात राहणारे केवळ २४ टक्के मुलंच नियमितप्रमाणे शिक्षण घेत आहेत. हे सर्वेक्षण दुर्बल घटकातील मुलांवर करण्यात आले. अर्धी मुले काही शब्दांपेक्षा जास्त वाचू शकत नाहीत. ७५ टक्के पालकांनी देखील कबूल केले की त्यांच्या मुलांच्या वाचन क्षमतेवर वाईट परिणाम झाला आहे.

सर्वेक्षणात सहभागी शिक्षकांच्या मते, मुलांच्या या पिढीला वैयक्तिक संभाषण(Personal Communication) क्षमतेच्या दृष्टीने कायमचे नुकसान झाले आहे. ICMR च्या रिपोर्टनुसार, १ ते १७ वयोगटातील मुलांना कोरोना होण्याचा धोका जास्त असतो परंतु कोरोनामुळं गंभीर होण्याचं प्रमाण कमी आहे.

मुलांमध्ये प्रौढांच्या तुलनेत कमी ACE 2 रिसेप्टर्स असतात. हे रिसेप्टर्स श्वसनमार्गामध्ये असतात आणि कोरोनाचा विषाणू त्यांना चिकटून अनेक पटीने वाढतो. सर्वेक्षणात असेही सांगण्यात आले आहे की देशातील ६-१७ वर्षांच्या अर्ध्याहून अधिक मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत म्हणजे त्यांना कोरोना होऊन गेला आहे असं जून २०२१ मध्ये संपूर्ण देशात झालेल्या सीरो-सर्वेमध्ये हे स्पष्ट होते. मुले क्वचितच रुग्णालयात पोहोचली. दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरिएंटमध्ये संक्रमणादरम्यान परिस्थिती तशीच राहिली.

आयसीएमआरच्या अहवालात शाळा उघडण्यावर भर देण्यात आला आहे. अहवालानुसार, प्राथमिक आणि नंतर माध्यमिक शाळा आधी उघडल्या पाहिजेत. लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका प्रौढांपेक्षा कमी दिसून आला आहे. आयर्लंड आणि यूके मध्ये शाळा उघडण्याच्या अनुभवाची उदाहरणे दिली आहेत.

अहवालात म्हटलं आहे की, शाळा उघडणे आणि कोरोना विषाणूच्या प्रसाराची विशेष लिंक नाही असं जागतिक आकडेवारी सिद्ध करते. शाळा उघडण्याच्या फायद्यांचा विचार करायला हवा. शाळा आणि महाविद्यालये पूर्वीप्रमाणेच सामान्य पद्धतीने उघडली पाहिजेत.

तथापि, ज्या जिल्ह्यांमध्ये किंवा राज्यांमध्ये अजूनही कोरोनाची अधिक प्रकरणे आहेत, तेथे निर्णय वेगळ्या पद्धतीने घेतला जाऊ शकतो असं अहवालात यावर भर देण्यात आला आहे. कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असलेली मुले किंवा आजाराने ग्रस्त मुले, ज्या मुलांच्या घरात कोरोनाची लागण झालेली आहे, त्यांना ऑनलाईन अभ्यासाची परवानगी दिली पाहिजे, उर्वरित विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या दिवशी म्हणजे अर्ध्या क्षमतेने शाळेत बोलावले जाऊ शकते.

५ वर्षांखालील मुलांना मास्क सक्तीतून वगळले पाहिजे. ६ ते ११ वर्षांची मुले त्यांच्या क्षमतेनुसार मास्क लावू शकतात आणि १२ वर्षांवरील मुले प्रौढांप्रमाणे सतत मास्क लावू शकतात. वर्ग खोल्या हवेशीर असाव्यात. रवींद्रनाथ टागोरांच्या शिक्षण व्यवस्थेचा संदर्भ देत पूर्वीचे वर्ग झाडांखाली आयोजित केले गेले होते, त्याचप्रमाणे नेदरलँड, अमेरिका आणि डेन्मार्कनेही अनेक शाळांमध्ये खुल्या वर्ग आयोजित केले आहेत, भारतही ते करू शकतो.

मोठा सभागृह हॉल आणि शाळेचे मोठे क्षेत्र अभ्यासासाठी वापरले पाहिजे. मुलांना बराच वेळ कॅन्टीनमध्ये जाण्यापासून रोखले पाहिजे. कर्मचाऱ्यांना लसी दिल्यास शाळा मुलांसाठी ने-आण करणारी वाहतूकही देऊ शकतात. शाळांमध्ये चाचणी सुविधांची व्यवस्था केली जाऊ शकते, जेणेकरून कोरोनाचा धोका वेळीच पकडता येईल. स्थानिक संक्रमणाचा आढावा घेत, एक वर्ग किंवा शाळा तात्पुरती बंद करण्याचा विचार केला जाऊ शकतो.