लग्नाचा हॉल बनला 'मिर्जापूर', आत सुरु होता गोळीबार तर बाहेर कारमध्ये बसून राहिले वर-वधू 

By पूनम अपराज | Published: January 19, 2021 05:26 PM2021-01-19T17:26:53+5:302021-01-19T17:30:24+5:30

Firing : रंगाचा बेरंग झाला, तुम्ही ही म्हण नक्की ऐकली असेल. काही असाच प्रकार पंजाबच्या तरनतारन येथे घडला. लग्न करण्यासाठी लग्नाचा हॉलवर पोहचलेल्या वर- वधूला बाहेरच रोखण्यात आलं, कारण हॉलच्या आत एकदम मिर्जापूर वेबसीरीज स्टाईलने पोलीस आणि गुंडांत बेछूट गोळीबार सुरु होता.

वर-वधू बाहेर कारमध्ये बसून वाट पाहत होते तर आतील गोळीबाराचा आवाज बाहेर ऐकू येत होता.  (all Photos - Aaj Tak)

दरम्यान पंजाबच्या तरनतारनमध्ये वर- वधू लग्नाचे रीतिरिवाज पूर्ण करून उर्वरित कार्यक्रमासाठी हायवेवर असलेल्या मॅरेज पॅलेसच्या बाहेर पोहचले तेव्हा त्यांना पोलीस आत जाण्यास मनाई करत होते. पोलिसांनी मॅरेज पॅलेसच्या चारी बाजूंना पोलिसांनी घेरले होते. कारण आत पाच लुटारू लपलेले होते आणि ते सतत गोळीबार सुरु होता. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पोलीस देखील गोळीबार करत होते.

जेव्हा पोलीस लुटारूंचा पाठलाग करत होते, तेव्हा लुटारूंनी मॅरेज हॉलमध्ये शिरकाव केला. त्यांचा पाठलाग करता करता पोलीस देखील हॉलमध्ये पोहचले. ३ तास पोलीस आणि लुटारूंमध्ये चकमक सुरु होती. तरनतारनचे एसएसपी ध्रुमन निंबले हे स्वतः घटनास्थळी पोहचले होते आणि या चकमकीचा जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. शेवटी पोलिसांनी एका गुंडाचा खात्मा केला, तर चार जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या चकमकीत ८० राऊंड फायर केले. 

दुसरीकडे वर-वधू फुलांनी सजवलेल्या कारमध्ये बाहेर बसून वाट पाहत होते आणि आतून चकमकीचा आवाज ऐकू येत होता. यादरम्यान वऱ्हाडी मॅरेज पॅलेसबाहेर रेंगाळलेले दिसून आले. 

वधूचे आजोबा मन्ना सिंह यांनी सांगितले की, त्यांच्या नातीचा विवाह सोहळा मॅरेज पॅलेसमध्ये होणार होता, त्यासाठी खूप आधी त्यांनी हॉल बुक केला होता. मात्र, ते जेव्हा पाहुण्यांसह तेथे पोहचले, तेव्हा दुसरेच चित्र समोर उभे राहिले. हॉलच्या बाहेर गोळीबाराचा आवाज ऐकू येत होता तर पोलिसांचा चमू मोठ्या प्रमाणावर दाखल झाला होता.