पोलिसाच्या प्रेमात वेडा झाला, पत्नीसह २ मुलांचा ३ वर्षांपूर्वी खून केला; मृतदेह बेसमेंटवर गाडले; अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 10:12 AM2021-09-02T10:12:02+5:302021-09-02T10:15:45+5:30

तीन वर्षांपूर्वी केलेल्या खुनाचा अखेर उलगडा; पोलिसांकडून मुख्य आरोपीला अटक

उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रेमात वेडावलेल्या एका व्यक्तीनं स्वत:च्या पत्नीची आणि दोन मुलांची हत्या केली. २०१८ मध्ये झालेल्या हत्येचं गूढ अखेर उलगडलं आहे.

आरोपी राकेशनं पत्नी आणि दोन लहान मुलांची दृश्यम स्टाईल हत्या केली. तिघांचे खून केल्यानंतर त्यानं मृतदेह बेसमेंटमध्ये गाडले. त्यानंतर ६ महिन्यांनी त्यानं घर भाड्यानं दिलं आणि कासगंजमध्ये आई वडिलांसोबत राहू लागला.

राकेशचा विवाह २०१२ मध्ये ऐटामध्ये वास्तव्यात असलेल्या रत्नेशसोबत झाला. राकेशनं त्याच्या कुटुंबाच्या दबावाखाली लग्नाला होकार दिला होता. गावातल्याच एका मुलीसोबत त्याचे प्रेमसंबंध असल्याचा आरोप आहे.

गावात राहणाऱ्या तरुणीसोबतचे संबंध लग्नानंतरही कायम होते. २०१५ मध्ये ती पोलिसात भरती झाली. त्यानंतर ती लग्नासाठी राकेशवर दबाव आणू लागली. त्यामुळे १४ फेब्रुवारी २०१८ रोजी त्यानं पत्नी आणि दोन मुलांची हत्या केली.

राकेशला एक तीन वर्षांची मुलगी आणि दोन वर्षांचा मुलगा होता. राकेशनं तिघांना संपवलं. त्यात त्याचे वडील बनवारीलाल, आई इंद्रावती, भाऊ राजीव आणि प्रवेश यांनी त्याला साथ दिल्याचा आरोप आहे. राकेश सध्या चिपियानातील पंचविहार कॉलनीत वास्तव्यास आहे.

राकेश आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिघांचे मृतदेह त्यावेळी राकेश राहत असलेल्या घराच्या बेसमेंटमध्ये गाडले. याची माहिती कोणालाही मिळू नये यासाठी गावावरून मजूर बोलावून राकेशनं मृतदेह गाडलेल्या जागी सिमेंटची भिंत उभारून घेतली. त्यानंतर पोलीस ठाण्यात ते हरवले असल्याची तक्रार दाखल केली. ६ महिन्यांनंतर प्रकरण शांत झालं. त्यानंतर राकेशनं घर भाड्यानं दिलं आणि तो कुटुंबासह राहू लागला.

राकेशनं तीन वर्षांनंतर, २५ एप्रिल २०२१ रोजी त्याच्या मित्राचा खून केला. त्यानं त्याच्या मृतदेहाजवळ आधार कार्ड आणि एलआयसीचे पेपर ठेवले. आपलाच खून झाल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न त्यानं केला आणि स्वत: ओळख लपवून राहू लागला.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि राकेशला अटक केली. चौकशीदरम्यान पोलिसी खाक्या दाखवताच राकेश पोपटासारखा बोलू लागला आणि तीन वर्षांपूर्वी केलेल्या हत्यांची कबुलीदेखील त्यानं दिली.

राकेशनं दिलेल्या कबुलीनंतर कासगंज पोलीस त्याला घेऊन ग्रेटर नोएडातील त्याच्या घरी गेले. प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खोदकाम सुरू केलं. आता पोलीस राकेशसोबत प्रेमसंबंध असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यादेखील चौकशी करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी राकेशसोबत त्याच्या वडिलांनादेखील अटक केली आहे.