१५ कोटीच्या वादातून सतीश कौशिक यांची हत्या?; महिलेचा खळबळजनक दावा, संपूर्ण घटना सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 09:06 AM2023-03-12T09:06:13+5:302023-03-12T09:09:50+5:30

बॉलिवूड दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं समोर आलं आहे. परंतु पोलीस सध्या त्याच्या फार्महाऊसचे सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य बाबींची पडताळणी करत आहेत. अभिनेत्याच्या रक्ताचे नमुने आणि हृदयाच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे.

मात्र आता या प्रकरणात एका महिलेच्या दाव्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.महिलेने दिल्ली पोलिसांकडे तक्रार दिली असून त्यात सतीश कौशिक यांचा खून झाल्याचा दावा केला आहे. ही महिला दुसरी कोणी नसून सतीश कौशिक यांची मैत्रीण आणि व्यापारी विकास मालू यांची पत्नी आहे.

१५ कोटींच्या वादातून तिच्या पतीने सतीश कौशिकची हत्या केल्याचा महिलेचा दावा आहे. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, काही वर्षांपूर्वी तिच्या पतीने सतीश कौशिक यांच्याकडून १५ कोटी रुपये घेतले होते. मात्र पतीकडे देण्यासाठी पैसे नसल्याने या वादातून त्याने ही हत्या केली.

वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाबाबत सतीश कौशिकच्या अनैसर्गिक मृत्यूची शक्यता नाकारली आहे. महिलेने दिल्ली पोलिसांकडे केलेल्या तक्रारीची पडताळणी होऊ शकली नाही, असेही सूत्राने स्पष्ट केले.

परंतु सूत्राने असेही सांगितले की या कथित तक्रारीवर अंतिम निर्णय येणे बाकी आहे, तपास पोलीस अधिकारी तक्रारीच्या सत्यतेची पुष्टी करतील मात्र दुबईत गुंतवणुकीसाठी पतीने कौशिक यांच्याकडून पैसे घेतले होते. मात्र तो परत देत नव्हता असं महिलेने म्हटलं.

महिलेने दिल्ली पोलिस आयुक्त कार्यालयात दाखल केलेल्या तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, अभिनेते कौशिक हे पैसे परत मागत होते, जे पतीला द्यायचे नव्हते. सतीश कौशिकची हत्या तिच्या पतीनेच काही औषधे देऊन केली असा दावाही महिलेने केला आहे.

त्यात एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्लीतील फार्महाऊसमधून काही 'ड्रग्ज' जप्त केली आहेत जिथे अभिनेते कौशिक पार्टीला गेले होते आणि त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. या औषधांची तपासणी करण्यासाठी लॅबमध्ये पाठवली आहेत.

महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचे लग्न १३ मार्च २०१९ रोजी व्यावसायिकासोबत झाले होते. तिच्या पतीनेच तिची अभिनेते सतीश कौशिक यांच्याशी ओळख करून दिली. एवढेच नाही तर सतीश कौशिक अनेकदा तिच्या पतीला दुबई आणि भारतात भेटत असे.

२३ ऑगस्ट २०२२ रोजी सतीश कौशिक दुबईतील महिलेच्या घरी आले होते आणि तिच्या पतीकडे १५ कोटी रुपयांची मागणी केली. 'मी ड्रॉईंग रूममध्ये होते, जिथे सतीश आणि माझ्या पतीमध्ये वाद झाला. कौशिक सांगत होता की, मला पैशांची नितांत गरज आहे असं म्हणत होते.

माझ्या पतीला गुंतवणुकीसाठी १५ कोटी रुपये देऊन तीन वर्षे झाली आहेत. कोणतीही गुंतवणूक केली नाही किंवा त्याचे पैसेही परत आले नाहीत, असेही सतीशने सांगितले. त्याला आता फसवणूक झाल्याचे जाणवत होते. दुबईतील एका पार्टीतील पती आणि कौशिकचा फोटोही तिने शेअर केला आहे.

या पार्टीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा मुलगाही उपस्थित असल्याचा आरोप महिलेने केला आहे. 'माझ्या पतीने सतीशला लवकरच पैसे परत करीन असे वचन दिले होते. जेव्हा मी माझ्या पतीला काय प्रकरण आहे ते विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की कोविड महामारीच्या काळात सतीशचे पैसे गेले. इतकेच नाही तर कौशिक यांच्यापासून सुटका व्हावी यासाठी ते प्लॅनिंग करत होते असं महिलेने म्हटलं.

माझा पती विविध प्रकारच्या ड्रग्जचा व्यवसाय करतो. २४ ऑगस्ट २०२२ रोजी पतीचा आणि सतीश कौशिक यांच्याशी पैशांवरून जोरदार वाद झाला. तिच्या पतीने सतीशला पैसे परत केल्याचेही सांगितले पण त्याचा कोणताही पुरावा नव्हता. पण तो पुन्हा पैसे देण्यास तयार आहे. फक्त थोडा वेळ हवा होता असं महिलेने दावा केला.

मात्र या प्रकरणाबाबत सतीश कौशिक यांच्या कुटुंबाच्या जवळच्या सूत्रांनुसार, सतीश कौशिक यांच्या मृत्यूबाबत कोणताही गैरप्रकार झाल्याचा दावा खरा नसल्याचे त्यांच्या नजीकच्या मित्रांनी सांगितले. कौशिकचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असून त्याच्या मृत्यूमागे कोणताही कट नव्हता असं ते म्हणाले.