२००० किमीची मर्डर मिस्ट्री! नाशिकमध्ये प्लॅन, कोलकात्यात हत्या अन् झारखंडमध्ये मृतदेह फेकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 16:08 IST2021-06-17T16:04:40+5:302021-06-17T16:08:35+5:30
Murder: अनैतिक संबंधातून बिहारमध्ये राहणाऱ्या एका ट्रक चालकाची हत्या करण्यात आली आहे.

झारखंडच्या जामताडा येथे अनैतिक संबंधातून एकाची हत्या झाल्याचं उघड झालं आहे. एका ट्रक किन्नराच्या बायकोचं ड्रायव्हरसोबत अनैतिक संबंधामुळे किन्नरनं हत्येचा प्लॅन रचला. आरोपीनं हत्येचं प्लॅनिंग नाशिकमध्ये बनवलं त्यानंतर कोलकात्यात हत्या केली आणि मृतदेह झारखंडमध्ये फेकून दिला. मृतक चालक बिहारच्या बांका जिल्ह्यात राहणारा आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा करत सांगितलं की, किन्नरनं ट्रक ड्रायव्हरची हत्या कोलकाताच्या चमरेल येथे पार्किंगमध्ये केली. त्यानंतर त्याचा मृतदेह ट्रकमध्ये घेऊन तो फिरत राहिला. त्यानंतर मृतदेहाचा दुर्गंध येऊ लागल्याने त्याने झारखंडच्या रस्त्यात जामताडा येथे रस्त्याच्या कडेला त्याचा मृतदेह फेकून दिला आणि फरार झाला.
काही ग्रामस्थांनी रस्त्याच्या कडेला कोणाचातरी मृतदेह पडलेला पाहून पोलिसांना फोन केला. मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी तो पोस्टमोर्टमसाठी पाठवला. हा मृतदेह कोणाचा आहे याचा शोध पोलिसांनी घेतला. त्यानंतर काही दिवसांत मृतक विजय कुमार उर्फ आकाश यादव असल्याची ओळख पटली. तो बिहारच्या बांका जिल्ह्यातील भेलवा गावचा रहिवासी होता.
मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी खूप मेहनत घेतली. रस्त्याच्या कडेला अज्ञात मृतदेह सापडल्याची बातमी आसपासच्या गावकऱ्यांनी कळाली त्यानंतर येथे दहशत माजली होती. मृतक आकाश यादव हा ट्रक चालवत असल्याचं पोलिसांना माहिती पडलं. त्याचं एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते.
मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करून त्याच्या अंत्यसंस्कार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हेगाराचा शोध सुरू केला. याबाबत एसपी दीपक सिन्हा म्हणाले की, सुरुवातीला या मृतदेहाची ओळख पटवणं हे आमच्यासाठी आव्हानात्मक होतं. मात्र पोलिसांनी त्याची ओळख शोधून काढली.
पोलीस अधिकारी संजय यांनी मृतदेहाचा फोटा मुख्यालयासह सर्व पोलीस ठाण्यात पाठवला. धनबादच्या सोशल मीडिया ग्रुपवर फोटो व्हायरल झाल्यानंतर मृतकाच्या कुटुंबाने तो आकाश यादव असल्याचं ओळख पटवली आणि मिहिजामा ठाणे पोलिसांना फोन केला. त्यानंतर पोलिसांनी याची शहानिशा करून मृतदेह कुटुंबाच्या हवाली केला.
फोटो पाहून कुटुंबाने मृतकाची ओळख आणि ट्रक चालक असल्याचं सांगत सहचालक रविंद्र यादव याची माहिती दिली. पोलिसांनी तपास केला असता रवींद्र त्याच्या मेव्हण्याच्या घरी यूपीतील बलिया येथील एका गावात लपला होता. पोलिसांनी रविंद्रला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून हत्येत वापरण्यात आलेले टायर लिवर रॉड जप्त केले.
मृतक आकाश यादव याचे रवींद्र यादव याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचं उघड झालं. ज्यावेळी रवींद्रला माहिती मिळाली तेव्हा त्याने पत्नीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तिनं ऐकलं नाही ती सतत आकाशला भेटायला जात होती. म्हणून आरोपी रवींद्रनं आकाशच्या हत्येचं प्लॅनिंग केले.
त्यानंतर एकेदिवशी रवींद्र आणि आकाश नाशिकहून ट्रक घेऊन कोलकाताला पोहचले होते तेव्हा संधीचा फायदा घेताच रवींद्रनं आकाशवर टायर लिवर रॉडनं हल्ला करून त्याची हत्या केली. त्यानंतर जामताडाच्या सतसाल येथे रस्त्याच्या किनारी त्याचा मृतदेह फेकून दिला.
एसपी दीपक कुमार सिन्हा म्हणाले की, रवींद्र यादवच्या अटकेनंतर पोलिसांनी त्याच्याकडून टायर लिवर रॉड आणि मोबाईल फोन आणि ट्रकच्या सीटवर लागलेले रक्ताचे कवर जप्त केले आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. रवींद्रनं ५ जून रोजी आकाशची हत्या केली होती.