पीपीई किटमधला चालक अन् मनसुख हिरेन यांनी शेवटच्या क्षणी बदललेलं लोकेशन; गूढ वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 01:13 PM2021-03-09T13:13:18+5:302021-03-09T13:16:52+5:30

Mansukh Hiren case: मनसुख हिरेन प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर; वाढतं गूढ उकलण्याचं आव्हान

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर काही दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेली गाडी आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. सध्या या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

राज्याचं दहशतवादविरोधी पथक, राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा यांनीदेखील स्फोटकांनी भरलेली गाडी नेमकी कुठून आली, या सगळ्या कारस्थानामागे नेमका कोणाचा हात होता, याची चौकशी सुरू केली आहे.

तपास यंत्रणा स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणाचा तपास करत असताना दररोज नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओसोबत दिसलेल्या इनोव्हा कारच्या चालकाबद्दलची महत्त्वाची माहिती तपासातून समोर आली आहे.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवण्यासाठी स्कॉर्पिओ आणि इनोव्हा अशा दोन गाड्या आल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून निष्पन्न झालं होतं. यापैकी इनोव्हा गाडीच्या चालकानं आपली ओळख लपवण्यासाठी पीपीई किट वापरल्याची माहिती पुढे आली आहे.

चालकानं पीपीई किट घातल्यानं सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याचा चेहरा दिसू शकलेला नाही. त्यामुळे हा चालक नेमका कोण होता, हे शोधून काढण्याचं आव्हान तपास यंत्रणांसमोर आहे.

इनोव्हा गाडी दोनदा मुंबईत आली होती. दोन्ही वेळेला ही गाडी मुकेश अंबानी यांच्या घराच्या परिसरात गेली होती.

मुकेश अंबानींच्या घराबाहेर आढळून आलेली गाडी मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. ही गाडी चोरीला गेली होती. हिरेन यांची गाडी अंबानींच्या घराबाहेर आढळून आल्यानंतर काही दिवसांतच हिरेन यांचा मृतदेह आढळून आला.

मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा इथल्या रेतीबंदर परिसरात आढळून आला. पण त्यांच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन वसईत आढळून आल्यानं गूढ वाढलं आहे.

१७ फेब्रुवारीला मनसुख हिरेन ओला कॅबनं क्रॉफर्ड मार्केटला जाण्यास निघाले होते. त्यावेळी त्यांनी शेवटच्या क्षणी लोकेशन बदललं होतं.

जे. जे. पुलावरून उतरल्यानंतर क्रॉफर्ड मार्केटला जाण्यासाठी कॅब चालक उजवीकडे वळणार होता. मात्र हिरेन यांनी त्यांना गाडी सरळ घेण्यास सांगितलं आणि ते सीएसएमटी स्थानकाजवळ असलेल्या शिवाला हॉटेल परिसरात उतरले. त्यामुळे या प्रकरणाचं गूढ वाढत चाललं आहे.