१ शिक्षिका, २५ शाळा अन् १ कोटी पगार; अखेर 'त्या' प्रकरणाचं गूढ उकललं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 08:57 PM2020-06-09T20:57:19+5:302020-06-09T21:03:14+5:30

अनामिका शुक्ला नावाची एक शिक्षिका उत्तर प्रदेशातल्या २५ शाळांमध्ये कागदोपत्री नोकरी करत असल्याचं प्रकरण गेल्या आठवड्यात प्रचंड चर्चेत होतं.

अनामिका शुक्लानं एकाच वेळी २५ शाळांमध्ये नोकरी करत असल्याचं भासवून तब्बल १ कोटी रुपये पगार घेतला. या अनामिकाचं बिंग फुटल्यानंतर आता खरीखुरी अनामिका पुढे आली आहे.

उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यात राहणाऱ्या खऱ्याखुऱ्या अनामिका शुक्ला यांनी नोकरीच नाही. त्या आजही बेरोजगार आहेत.

माझ्याकडे कोणतीही नोकरी नाही. माझ्या शैक्षणिक कागदपत्रांचा वापर करून फसवणूक सुरू असल्याचा दावा अनामिका शुक्ला यांनी केला.

शुक्ला यांनी त्यांची मूळ शैक्षणिक कागदपत्रं बेसिक शिक्षण अधिकारी डॉ. इंद्रजीत प्रजापती यांना दाखवली.

कस्तुरबा बालिका विद्यालयात विज्ञान शिक्षक पदासाठी २०१७ साली सुलतानपूर, जौनपूर, बस्ती, मिर्झापूर आणि लखनऊमध्ये अर्ज केला होता. मात्र नोकरीच मिळाली नाही, असा दावा शुक्ला यांनी केला.

शैक्षणिक कागदपत्रांचा गैरवापर होत असल्याचं, त्या माध्यमातून फसवणूक केली जात असल्याचं शपथपत्र शुक्ला यांनी दिल्याची माहिती बीएसए प्रजापती यांनी दिली.

अनामिका शुक्ला यांच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे नोकरी करणारी एक तरुणी गेल्याच आठवड्यात पकडली गेली.

अनामिका शुक्ला यांच्या कागदपत्रांच्या मदतीनं शासनाची फसवणूक करणाऱ्या तरुणीनं आपण २५ शाळांमध्ये नोकरी करत असल्याचं भासवलं.

बोगस अनामिका शुक्लानं शासनाकडून तब्बल १ कोटी रुपये पगार घेतला. संपूर्ण देशात हे प्रकरण गाजलं.

या संपूर्ण प्रकरणामागे मोठं रॅकेट असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.