नक्षलवादी जिल्ह्यात शालेय शिक्षण घेतलेले आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे, जाणून घेऊया त्यांच्याबाबत अधिक माहिती 

By पूनम अपराज | Published: January 7, 2021 07:28 PM2021-01-07T19:28:18+5:302021-01-07T20:11:33+5:30

IPS Hemant Nagrale : सुबोधकुमार जयस्वाल यांना केंद्रात प्रतिनियुक्ती मिळाल्यानंतर राज्याला नववर्षात नवीन पोलीस महासंचालक मिळणार आहेत. त्यामुळे राज्याचे नवीन पोलीस महासंचालक कोण होणार याची चर्चा रंगली होती. मात्र, आता महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार हेमंत नगराळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. सध्या ते लीगल आणि टेक्निकल विभागाचे डीजी आहेत.

आज दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास नगराळे यांनी सुबोधकुमार जयस्वाल यांच्याकडून अतिरिक्त कार्यभार स्विकारला आहे. त्यामुळे तूर्तास तरी तात्पुरती का होईना राज्याच्या सुरक्षेची जबाबदारी नगराळे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.   

हेमंत नगराळे कोण आहे? - हेमंत नगराळे हे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या त्यांच्याकडे महाराष्ट्र डीजीपी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. पुढील १९ महिने ते महाराष्ट्राचे डीजीपी म्हणून राहू शकतात. २०१६ मध्ये नगराळे हे नवी मुंबईचे पोलिस आयुक्तही होते. त्यानंतर वर्ष २०१८ मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. सध्या नगराळे हे पोलीस महासंचालक (कायदेशीर व तांत्रिक) या पदावर कार्यरत आहेत.

हेमंत नगराळे यांचे प्रशंसनीय कार्य -  हेमंत नगराळे जेव्हा नवी मुंबईचे पोलीस आयुक्त होते, तेव्हा वाशी परिसरातील बँक ऑफ बडोदा येथे झालेल्या दरोड्याने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. या प्रकरणात हेमंत नगराळे यांच्या पथकाने अवघ्या 2 दिवसातच या गुन्हाच तपास केला. पॉप गायक जस्टिन बीबर यांच्या कार्यक्रमादरम्यान चांगल्या प्रकारे कायदा व सुव्यवस्था राखल्याबद्दल सरकारने त्यांचे कौतुक केले. आपल्या कर्तव्यावर दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करण्यासाठीही ते प्रसिद्ध आहे.

हेमंत नगराळे आणि वाद - विधान परिषदेची मान्यता न घेता त्यांनी शेकाप पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज वसुलीच्या प्रकरणात हेमंत नगराळे यांनी बँकेचे अध्यक्ष व ऑपरेटरविरूद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. विधानपरिषदेच्या सभापतींच्या अंजूरीशिवाय कोणत्याही आमदारांवर एफआयआर दाखल करता येत नाही.  यामुळे तत्कालीन अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांनी पोलीस उपायुक्त तुषार जोशी यांच्यासह नगराळे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

नगराळे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत सहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर नागपूर येथील पटवर्धन हायस्कुलमध्ये पुढील शिक्षण पूर्ण केले. नागपूरच्या व्हीआरसीई (आताची व्हीएनआयटी) मधून बीई (मेकॅनिकल) मधून ग्रॅज्युएट झाले.  

राष्ट्रपती पदक, विशेष सेवा पदक आणि अंतरिक सुरक्षा पदकाने त्यांना गौरविण्यात आले आहे. १९८७ बॅचचे आयपीएस असलेले हेमन्त नगराळे यांची पहिली पोस्टिंग १९८९ साली  नक्षलवादी जिल्हा ओळखला जाणाऱ्या चंद्रपूरमधील राजुरा येथे एएसपी म्हणून झाली. तेथे त्यांनी १९९२ पर्यंत कामकाज पाहिले. नंतर १९९२ ते १९९४ सोलापूर येथे कार्यकाळ पार पडताना त्यांनी १९९२ साली झालेल्या बाबरी मशीद पतनवरून सोलापूरमध्ये झालेली दंगल नियंत्रित केली होती. त्यानंतर १९९४ ते १९९६ त्यांनी रत्नागिरीचे एसपी म्हणून कामकाज केले. नंतर १९९६ ते १९९८ CID आणि crime चे एसपी त्यांनी कार्यभार सांभाळला, त्यादरम्यान त्यांनी एमपीएससी पेपर लीक प्रकरणात तपास केला. तसेच अंजनाबाई गावित प्रकरण जे लहान मुलांचे अपहरण करून हत्या प्रकरण आहे. त्यात त्यांनी महत्वाचा तपास केला. नंतर १९९८ ते २००२  नगराळे यांनी सीबीआयला काम केले. 

२००७- २००८ या दरम्यान ते मुंबईच्या ईस्ट रिजनचे अतिरिक्त पोलीस आयुक्त होते. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचे ते साक्षीदार आहेत. २६/११ अतिरेकी हल्ल्यावेळी हेमंत नगराळे यांनी महावितरणच्या प्रतिनियुक्तीवर असतानाही घरातून बाहेर काढले आणि जखमी व मृतांना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात मदत केली. संशयास्पद वस्तू शोधताना त्यांनी आरडीएक्सची बॅग शोधून पाहणी केली आणि बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडला बोलावून तो परिसर सुरक्षित केला. ते चार पोलिसांसह हॉटेल ताजमध्ये दाखल झाले आणि त्यांनी जखमी आणि मृतांचा बाहेर काढून रुग्णालयात हलविले. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधला आणि त्यांनी कर्मचार्‍यांना तैनात केले. स्टाफच्या मदतीने ते हॉटेल ताजच्या शॉपिंग प्लाझामध्ये अडकलेल्या शेकडो लोकांना वाचवू शकले.

त्यानंतर मुंबई पोलिसांच्या ऍडमिन विभागाचे सहपोलीस आयुक्त म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. दरम्यान २०१४ नगराळे यांना मुंबई पोलीस आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी रास्ता रोको चळवळ अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळली. याबाबत त्यांचे गृहमंत्र्यांनी कौतुक केले होते. २०१६ ते २०१८ या काळात त्यांनी नवी मुंबईचे आयुक्त म्हणून पदभार सांभाळला. ऑक्टोबर २०१८ मध्ये त्यांना डीजी म्हणून पदोन्नती मिळाली, त्यावेळी त्यांनी राज्यातील फॉरेन्सिक सायन्स लॅबची जबाबदारी सांभाळली. नगराळे हे  एक उत्साही गोल्फर आणि टेनिसपटू आहे आणि ज्युडो कराटेमध्ये त्यांनी ब्लॅक बेल्ट पटकावला आहे. तसेच त्यांनी ऑल इंडिया पोलीस खेळांत अनेक पदके जिंकली आहेत.

Read in English