Shocking! भारतीय नर्सची फ्लोरिडात चाकूने सपासप वार करून निघृण हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 07:29 PM2020-07-31T19:29:32+5:302020-07-31T19:52:45+5:30

अमेरिकेत एका रुग्णालयाबाहेर भारतीय नर्सची चाकूने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चाकू भोसकून नर्सला कारखाली चिरडून मारेकरी पसार झाला.

घरगुती हिंसाचारातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, या प्रकरणी तिच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

अमेरिकेतील दक्षिण फ्लोरिडामधील ब्रोवर्ड हेल्थ कोरल स्प्रिंग्स हॉस्पिटलबाहेर ही धक्कादायक घटना घडली. मेरिन जॉय (२६) असं हत्या झालेल्या या नर्सचं नाव आहे. ती मूळची केरळ येथील राहणारी होती.

ती फ्लोरिडातील ब्रोवर्ड हेल्थ कोरल स्प्रिंग्ज हॉस्पिटलमध्ये काम करत होती. मंगळवारी ती हॉस्पिटलमधून निघताना मारेकऱ्याने तिच्यावर चाकूने सपासप अनेक वार केले. गंभीर जखमी झाल्याने ती जागीच कोसळली. त्यानंतर तिला कारखाली चिरडून आरोपी फरार झाला असल्याचं प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

कोरल स्प्रिंग्स पोलीस डेप्युटी चीफ ब्रॅड मॅककेओन यांनी या प्रकरणी पोलिसांनी तिचा पती फिलिप मॅथ्यू (३४) याला अटक केली आहे. तो वेलियानाड येथील मूळचा राहणारा आहे, असे सांगितले. 

पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरगुती वादातून ही हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितले. मॅथ्यू हा पत्नीची हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून पळाला होता.

मेरिन फ्लोरिडातील हॉस्पिटलमध्ये ऑगस्ट २०१८ पासून काम करत होती. गेल्या काही महिन्यांपासून ती पतीपासून विभक्त राहत होती. तिला दोन वर्षांची मुलगी आहे. मेरिनची आई आणि दोन वर्षांची मुलगी नोरा मे महिन्यात अमेरिकेत तिच्यासोबत राहायला येणार होत्या. मात्र, कोरोना संकटामुळे त्या दोघी अमेरिकेला जाऊ शकल्या नाही. मेरिनचे वडील हे शेतकरी आहेत.

घटनेनंतर काही तासांतच आरोपी मॅथ्यूला पोलिसांनी अटक केली. प्रत्यक्षदर्शींनी मारेकऱ्याच्या कारचे वर्णन केले होते. या माहितीवरून त्यांनी मॅथ्यूला एका हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले.