७ कोटी रोकड, १२ किलो सोनं अन् ११०० लॉकर...; IT विभागानं केला मोठा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 05:27 PM2023-11-10T17:27:14+5:302023-11-10T17:38:51+5:30

राजस्थानमधील जयपूरच्या गणपती प्लाझामध्ये काळ्या पैशासंदर्भात आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. इथं दोन लॉकर कापण्यात आले आहेत. एका लॉकरमधून लाखोंची रोकड जप्त करण्यात आली आहे. दुसऱ्या लॉकरमध्ये नोटांनी भरलेली पोती सापडली.

पैशांची मोजणी सुरूच आहे. गेल्या महिन्यात राज्यसभा खासदार किरोरी लाल मीना यांनी पेपर लीकद्वारे कमावलेला काळा पैसा या लॉकर्समध्ये ठेवल्याचा आरोप केला होता. या प्रकरणातील पहिला छापा १३ ऑक्टोबर रोजी टाकण्यात आला.

तपासात लॉकरधारकांचा डेटा तयार करण्यात आला. त्यानंतर २० ऑक्टोबर रोजी ८० लॉकरधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या. १७ ऑक्टोबर रोजी तीन लॉकरमधून ३० लाख रुपये काढण्यात आले. २१ ऑक्टोबर रोजी २.४६ कोटी रुपये वसूल करण्यात आले.

आतापर्यंत लॉकरमधून ७ कोटी रुपयांहून अधिक रोख आणि १२ किलोहून अधिक सोने जप्त करण्यात आले आहे. गणपती प्लाझामध्ये सुमारे ११०० लॉकर्स आहेत. त्यापैकी ५४० लॉकर्स एक्टिव्ह नाहीत.

काही लॉकर असे देखील सापडले आहेत ज्यांच्या मालकाचे नाव आणि पत्ता उपलब्ध नाही. म्हणजेच ज्याच्या नावावर हे लॉकर्स घेतले गेले आहेत ती व्यक्ती अस्तित्वात नाही. छाप्यादरम्यान आयकर विभागाला काही महत्त्वाची कागदपत्रेही हाती लागले आहेत. जी जप्त करण्यात आली आहेत.

गणपती प्लाझाच्या लॉकरमधून रोख रक्कम आणि सोने सापडल्याबाबत भाजपा खासदार किरोरी लाल मीना यांना विचारले असता, 'मी जे बोललो होतो, तेच झाले.' गणपती प्लाझाच्या १०० लॉकरमध्ये ५० किलो सोने आणि सुमारे ५०० कोटी रुपयांचा काळा पैसा लपवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. केएल मीना हे लॉकर्स उघडण्यासाठी आंदोलनाला बसले होते.

या संदर्भात भाजपा खासदारानं राजस्थान अँटी करप्शन ब्युरो, आयकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाकडे तक्रारही केली होती. राजस्थानमधील विविध घोटाळे आणि पेपर लीक घोटाळ्यातून हा पैसा गोळा करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे.

विधानसभा निवडणूक मतदानाच्या १५ दिवस आधी राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये आयकर विभागानं ही मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी सकाळपासून आयटी अधिकारी गणपती प्लाझाच्या रोयरा सेफ्टी वॉलेटचे अत्यंत संवेदनशील लॉकर तोडण्यात गुंतले होते.

गेल्या महिन्यातही काही लॉकर उघडले असता त्यांच्याकडून १.२५ कोटी रुपये रोख आणि एक किलो सोने जप्त करण्यात आले होते. रोख रक्कम इतकी मोठी होती की ती मोजण्यासाठी मशीन्स मागवाव्या लागल्या. आजही असाच काही मोठा खजिना सापडेल अशी सर्वांना आशा होती.

निवडणुकीपूर्वी खासगी लॉकर्समधून कोट्यवधी रुपये आणि मोठ्या प्रमाणात सोने वसुली झाल्याने राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. गणपती प्लाझाच्या लॉकरमध्ये ज्या लोकांनी आपली मालमत्ता ठेवली आहे त्यांचीही कोंडी झाल्याचे चित्र आहे.