Disha Salian Case : सीबीआय चौकशीची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली

By पूनम अपराज | Published: November 27, 2020 09:20 PM2020-11-27T21:20:50+5:302020-11-27T21:33:53+5:30

Disha Salian Case : दिशा सॅलियन हिच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. दिशा ही बॉलिवूडचे दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतची माजी मॅनेजर होती.

अभिनेत्याच्या मृत्यूच्या अवघ्या आठवड्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. तेव्हापासून काही लोक दिशा सलीयन आणि सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूचा संबंध एकमेकांना जोडत होते.

या संदर्भात दिल्लीचे वकील पुनीत ढांडा यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आपल्या याचिकेत त्यांनी दिशा सॅलियनच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याबाबत विनंती न्यायालयात केली होती. ही याचिका आता कोर्टाने फेटाळली आहे आणि असे म्हटले आहे की, जर दिशाच्या मृत्यूबाबत कोणाकडे पुरावा असेल तर ते पोलिसांशी संपर्क साधू शकतात. 

पुनीत ढांडा यांच्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी यांच्या खंडपीठाने सुनावणी केली. तसेच न्यायालयाने म्हटले आहे की, अशी याचिका सुनावली जात नाही. कोर्टाने पुनीत यांना  विचारले, 'तू कोण आहेस? दिशा सॅलियनच्या मृत्यूच्या बाबतीत काही गडबड झाली असेल तर त्याचे कुटुंब कायद्यानुसार योग्य ती पावले उचलू शकते.

ही याचिका फेटाळून लावताना कोर्टाने निकाल देताना पुढे सांगितले की, मुंबई पोलिसांनी ५ ऑगस्टला एक प्रेस नोट जारी केली होती. ज्यामध्ये असे म्हटले होते की, ज्या कोणाला दिशा सालियनच्या मृत्यूची माहिती आहे. त्याने मुंबई पोलिसांशी संपर्क साधावा. तथापि, याचिकेत असा कुठेही उल्लेख नाही की, कोर्टात येण्याआधी पोलिसांशी संपर्क साधण्यात आला होता. याचिकाकर्त्याने थेट न्यायालयात धाव घेतली.

२८ वर्षीय दिशा सॅलियन हिचे ८ जून रोजी मृत्यू झाला. मुंबईच्या मालाडमधील एका बहुमजली इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडल्यानंतर तिचे निधन झाले. या संदर्भात मालवणी पोलिसांनी अपघाती मृत्यू अहवाल (एडीआर) नोंदविला होता. अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांचे १४ सप्टेंबर रोजी दिशा सॅलियनच्या ठीक एक आठवड्यानंतर निधन झाले. तेव्हापासून बरेच लोक या दोघांचे मृत्यूचे एकमेकांशी धागेदोरे जोडण्यात आले होते.