डेटिंग अ‍ॅपवर डॉक्टर महिलेशी मैत्री करून मिळवले तिचे फोटो अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 05:28 PM2020-06-01T17:28:02+5:302020-06-01T17:46:20+5:30

कबीर सिंग हा बॉलिवूड चित्रपट पाहिल्यानंतर इव्हेंट कंपनी चालवणारा आरोपी ब्लॅकमेलर बनला असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने डेटिंग अ‍ॅप, मॅट्रिमोनिअल साइटद्वारे श्रीमंत महिलांशी मैत्री करून ब्लॅकमेल करणार्‍या ठगाला जेरबंद केले आहे.

मॉडेल होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका सुंदर तरुणीचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले गेले. मिळालेल्या माहितीनुसार,आरोपीने मॅट्रिमोनिअल साइटवर बनावट खातं तयार केलं. त्यानंतर मुलींना लग्नाची खात्री पटवून देत त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी महिलांचे खासगी फोटो मिळवले. आरोपी उच्चभ्रू महिला आणि तरुणींना टार्गेट करायचे. 

याप्रकरणी एका महिला डॉक्टरच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला त्याच्या एका साथीदारासह अटक केली. स्वत: हाडांचा डॉक्टर असल्याची बतावणी करून आरोपीने डेटिंग अ‍ॅपवर आपलं प्रोफाइल बनवलं होतं.

सायबर सेलने दिलेल्या माहितीनुसार आरोपीने आतापर्यंत अनेक मुली आणि महिलांना ब्लॅकमेल केलं आहे. गाझियाबाद येथील रहिवासी आनंद कुमार आणि त्याचा मित्र प्रियांम यादव असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

सायबर सेलचे डीसीपी डॉ. अनेश राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिला डॉक्टरने डॉ. रोहित गुजराल नावाच्या व्यक्तीशी डेटिंग अ‍ॅपद्वारे मैत्री केल्याची तक्रार दिली. त्याने तिच्याशी लग्न करण्यास सांगून जवळीक वाढवली. आरोपीने सोशल मीडियावरून काही खासगी फोटो आणि व्हिडिओ शोधले. नंतर तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

पीडितेने नकार दिल्यास आरोपीने तिचे खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली आणि त्याबदल्यात 30,000 रुपये घेतले.

पीडित डॉक्टरच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी लाजपत नगर मेट्रो स्टेशनजवळ पाळत ठेवून आरोपीला अटक केली.

त्यानंतर आरोपीच्या साथीदारालाही अटक करण्यात आली. यापूर्वीही अनेक महिलांनी आरोपीविरोधात तक्रार केली होती. त्यानुसार आता पोलीस पुढील तपास करत आहेत.