आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, गुजरातमधून 12-15 हजार कोटींचे हेरोईन जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 06:17 PM2021-09-21T18:17:06+5:302021-09-21T18:20:42+5:30

DRI ची कारवाई अजूनही सुरू असून, यामागे मोठं राकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नवी दिल्ली- महसूल गुप्तचर संचालनालया(DRI)ने ड्रग्सविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. गुजरातच्या कच्छ येथील मुंद्रा बंदरातून सुमारे 12 ते 15 हजार कोटी रुपयांचे हेरॉईन ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. ड्रग्जची ही खेप अफगाणिस्तानातून इराणमार्गे भारतात आणली आहे. चार दिवस चाललेल्या डीआरआयच्या मोठ्या ऑपरेशननंतर हा माल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी एकूण 5 लोकांना अटक करण्यात आली आहे.

अनेक ठिकाणी छापेमारी- विशेष म्हणजे, सुरुवातीच्या तपासात 9 हजार कोटी रुपयांची 3 हजार किलो हेरॉईन जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. पण, हळुहळून हा आकडा वाढत 12 ते 15 हजार कोटींच्या घरात गेला असून, आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. गुजरातच्या कच्छ येथील मुंद्रा पोर्टवर डीआरआयकडून ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर डीआरआयकडून अहमदाबाद, चेन्नई आणि दिल्लीपर्यंत अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे.

टॅल्कम पावडर असल्यासं बनावं- डीआरआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेरोइन घेऊन जाणारे कंटेनर आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील एका फर्मने आयात केलं होतं. या फर्मने कंटेनरमध्ये 'टॅल्कम पावडर' असल्याचा बनाव केला होता. अफगाणिस्तानच्या कंधार येथील हसन हुसेन लिमिटेड या कंपनीने हे कंटेनर पाठवलं आहे. डीआरआयने या कंटेनरची तपासणी केल्यानंतर हा एवढा मोठा ड्रग्सचा साठा दिसून आला.

नार्को टेरर अँगल ?- डीआरआयचे हे ऑपरेशन अजूनही चालू आहे. फॉरेन्सिक लॅबमध्ये या ड्र्ग्सची तपासणी केली जात आहे. तालिबानकडून हे ड्रग्स भारतात पाठवले असल्याची माहिती आहे. या प्रकरणात आता नार्को टेरर अँगलनेही तपास केला जाणार आहे. सध्या डीआरकडून अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, गांधीधाम आणि मांडवी येथे छापेमारी सुरू आहे.

अफगाणिस्तानात उत्पादन-अफगाणिस्तान जगातील सर्वात मोठा हेरॉईन उत्पादक देश आहे. अफगाणिस्तानात जागतिक उत्पादनाच्या 80-90 टक्के हेरॉईनचे उत्पादन होते. मागील काही वर्षात अफगाणिस्तानमध्ये हेरॉईनचे उत्पादन झपाट्याने वाढले आहे. हेरॉईन उत्पादन तालिबानचे प्रमुख आर्थिक स्त्रोत आहे.

अदानी पोर्टकडे मुंद्रा पोर्टची मालकी- मुंद्रा बंदराची मालकी अदानी पोर्टकडे आहे. अदानी पोर्ट ही प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांची कंपनी आहे. महसूल गुप्तचर संचालनालय आणि सीमाशुल्क विभागाच्या संयुक्त ऑपरेशनमध्ये ही मोठ्या प्रमाणात हेरॉईन जप्त करण्यात आली आहे. डीआरआय आणि कस्टमने गेल्या पाच दिवसांपासून सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. या कारवाईदरम्यान, मुंद्र पोर्टवरील दोन कंटेनरच्या तपासात 9 हजार करोड रुपयांचं ड्रग्स जप्त करण्यात आलं. तसेच, या प्रकरणात आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली असून, या ड्रग्ज तस्करीत मोठं रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कारवाईनंतर डीआरआकडून देशातील पाच शहरांमध्ये तपास सुरु करण्यात आला.